मुंबई: डिग्री कॉलेजात प्रवेश मिळवायला काय आवश्यक असतं? बारावीला उत्तम टक्के. नाही, केवळ टक्के मिळवून प्रवेशाचं स्वप्न पाहत असाल तर सावध व्हा. पुढच्या वर्षीपासून डिग्री प्रवेशासाठी तुमचं नाव मतदार यादीत आहे का याची विचारणा केली जाणार आहे. मुंबई विद्यापीठानंच तसा फतवा काढला आहे.
पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणारे बहुतांश विद्यार्थी वयाची १८ वर्षे पूर्ण केलेले असतात. त्यामुळे मतदार यादीत नाव असणं बंधनकारक करावं का याविषयीचा सल्लाही विद्यापीठानं सर्व संलग्न महाविद्यालयांकडून मागवला आहे. महाविद्यालयांनी प्रवेश अर्जात हा नवा पर्याय समाविष्ट करावा, असे परिपत्रक विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागानं काढलं आहे. तरुण मतदारांची संख्या वाढावी यासाठी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या अभियानांतर्गत हा निर्णय घेण्यात आला आहे.
‘पदवी महाविद्यालयांचे प्रवेश ऑनलाइन होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मतदार यादीचे तपशील त्यांच्या प्रवेश अर्जात समाविष्ट करण्यात अडचण येणार नाही. पण यामुळे मूळ हेतू साध्य होईल का याबद्दल साशंकता आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी मतदार नोंदणीबाबत जनजागृती करतच असतात. शिवाय मतदार यादीत नाव नाही म्हणून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी अपात्र ठरवता येणार नाही,’ असे सेंट अँड्र्यूज महाविद्यालयाच्या प्राचार्य मेरी फर्नांडीस म्हणाल्या.