Published On : Sun, Jun 17th, 2018

मुंबई बातम्या : मुख्यमंत्र्यांची हायपरलूपच्या अमेरिकेतील चाचणी केंद्रास भेट

Advertisement

मुंबई: मुंबई-पुणे मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्याच्या दिशेने आज आणखी एक महत्वाचे पाऊल पडले असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जिन हायपूरलूप कंपनीच्या अमेरिकेतील चाचणी केंद्राला आज भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली. तसेच मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स उभारण्यासह नागरिकांना सेवा अधिक गतीने देता याव्यात यासाठीही ओरॅकल ही कंपनी राज्य शासनासोबत काम करणार आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्याचे शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे. आज दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात या पथकाने नेवाडा येथे व्हर्जिन हायपरलूप कंपनीच्या चाचणी केंद्रास भेट दिली. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संचालक रॉब लॉईड यांनी मुख्यमंत्र्यांना यासंदर्भातील संपूर्ण माहिती दिली. मुंबई-पुणे या मार्गावर हायपरलूप तंत्रज्ञानावर आधारित अतिवेगवान रेल्वे प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे. या प्रकल्पाची व्यावहारिक उपयोगिता पडताळण्यासाठी नुकताच एक अभ्यासही करण्यात आला आहे. व्हर्जिन हायपरलूपचे संस्थापक आणि अध्यक्ष सर रिचर्ड ब्रॅनसन यांनी मुंबईत आयोजित मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत फ्रेमवर्क कराराची घोषणाही केली होती.

आज झालेल्या चर्चेनुसार, व्हर्जिन हायपरलूप लवकरच आपल्या अभियंत्यांचे पथक पुण्याला पाठविणार आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीएने पहिल्या टप्प्यात 15 किलोमीटरचा प्रायोगिक मार्ग (ट्रॅक) निश्चित केला आहे. मुंबई-पुणे अंतर केवळ 20 मिनिटांवर आणणाऱ्या या तंत्रज्ञानासाठी आवश्यक असणारी 70 टक्के सामुग्री आणि उपकरण हे महाराष्ट्रातच उपलब्ध होऊ शकणार आहेत. या 100 टक्के इलेक्ट्रीक व कार्यक्षम प्रणालीमुळे दीड लाख टन कार्बनचे उत्सर्जन प्रतिवर्षी कमी होणार असून वेळेची बचत, पर्यावरण रक्षण, अपघातांच्या संख्येत घट, वाहतूक कोंडीतून सुटका असे अनेक सामाजिक व आर्थिक फायदेसुद्धा होणार आहेत.

‘ओरॅकल’ तर्फे मुंबईत अत्याधुनिक डाटा सेंटर्स
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया अभियानाला पाठबळ देण्यासाठी ओरॅकलने एक अभियान हाती घेतले आहे. त्यासाठी सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी ‘ओरॅकल’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफ्रा कात्झ यांचीदेखील सॅन फ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. मुंबईमध्ये अत्याधुनिक डाटा सेंटर्स सुरु करण्याची ‘ओरॅकल’ची तयारी आहे. त्यासाठी आवश्यक गुंतवणूक प्रस्तावांवरील कार्यवाहीस राज्य शासनाने गती द्यावी, अशी विनंती त्यांनी केल्यानंतर या संदर्भातील कार्यवाहीसाठी ‘ओरॅकल’ला आवश्यक ती सर्व मदत राज्य सरकारतर्फे दिली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. जनसामान्यांना अधिक चांगल्याप्रकारे सेवा प्रदान करण्यासाठी आर्टिफिशियल इंटिलिजन्सचा वापर शासकीय माहितीच्या संदर्भात करता यावा, या हेतूने एक संयुक्त गट स्थापन करण्याबाबतसुद्धा यावेळी सहमती झाली. सोबतच आर्टिफिशियल इंटिलिजन्स, फिनटेक, क्लाऊड कम्प्युटिंग इत्यादींसंदर्भातही सविस्तर चर्चा झाली. नागरिकांना आपल्या कामांसाठी अनेक प्रकारची माहिती घेऊन विविध शासकीय विभागांकडे जावे लागते. यापासून त्यांना दिलासा देण्यासाठी एक विशिष्ट प्रणाली विकसित करण्यासंदर्भातदेखील राज्य सरकार ‘ओरॅकल’सोबत काम करणार आहे.

सायबर सुरक्षेसंदर्भात ‘सिमॅन्टेक’शी करार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘सिमॅन्टेक’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग क्लार्क यांचीही सॅनफ्रॅन्सिस्को येथे भेट घेतली. राज्य सरकारचा माहिती-तंत्रज्ञान विभाग आणि ‘सिमॅन्टेक’ यांच्यात सायबर सुरक्षेसंदर्भात एका सामंजस्य करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. सायबर पोलिसिंग संदर्भात ‘सिमॅन्टेक’ आणि गृहविभाग यांच्यात संयुक्त कृतीदल स्थापन करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. या माध्यमातून यापूर्वीच स्थापन करण्यात आलेल्या सायबर लॅबची क्षमता वृद्धी आणि विकास साध्य होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रवीण परदेशी, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते.