Published On : Mon, Mar 20th, 2023

श्री.गडकरी – श्री फडणवीसांनी घेतला अजनी चौकातील वॉकर स्ट्रीटचा आनंद

- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते 'आम्ही नागपुरी' सेल्फी पॉइंटचे लोकार्पण
Advertisement

नागपूर : नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या अजनी चौकातील क्लॉक टॉवर परिसराला नवीन लूक प्रदान करण्यात आला आहे. या चौकात वॉकर स्ट्रीट तयार करण्यात आले असून, नाविन्यपूर्ण रोषणाईने सजविण्यात आलेल्या आणि आल्हाददायी वातावरणाची अनुभूती देणाऱ्या या वॉकर स्ट्रीटचा केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी आनंद घेतला. निमित्त होते अजनी चौकातील क्लॉक टॉवर खालील सेल्फी पॉइंटच्या लोकार्पणाचे. नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अजनी चौक येथील क्लॉक टावर खाली ‘आम्ही नागपुरी’ हे सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहे. रविवार ( ता.१९) रोजी केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘आम्ही नागपुरी’ हे सेल्फी पॉईंटचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, आमदार श्री प्रवीण दटके, मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा अतिरिक्त आयुक्त श्री. अजय गुल्हाने, मनपाचे उपायुक्त श्री. रवींद्र भेलावे, उद्यान अधीक्षक अमोल चौरपगार, अधीक्षक अभियंता श्री. मनोज तालेवार,राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. नरेश बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) अजय मानकर, अर्बन डेव्हलोपमेंटचे वास्तुविशारद श्री. हर्षल बोपर्डीकर, श्रीमती तेजल रक्षमवार, श्रीमती राशी बावनकुळे, श्री. गोरज बावनकुळे यांच्यासह मनपाचे अधिकारी व कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

अजनी चौकातील क्लॉक टॉवर खालील सेल्फी पॉइंटवर विशेष रोषणाईने करण्यात आली आहे. नागपूर शहराची शान वाढविणाऱ्या या क्लॉक टॉवर परिसरात सौंदर्यीकरणाचे करण्यात आले आहे. क्लॉक टॉवर परिसरात ‘आम्ही नागपुरी’ असा सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि नागपूर महानगरपालिका यांच्या शहर सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गत राहटे कॉलनी चौक ते चिंचभवन उड्डाणपूल यादरम्यान वॉकर स्ट्रीट, सायकलिंग ट्रॅक उभारण्यात येत असून, वाटसरू आणि सायकल चालविणाऱ्यांसाठी हा मार्ग अधिक सुरक्षित व सुखर करण्यात येणार आहे.

विशेष म्हणजे, या मार्गावर केंद्रीय मंत्री श्री. गडकरी यांच्या सीआरएफ(केंद्रीय मार्ग निधी) फंडमधून तसेच राज्य सरकारच्या मदतीने सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. याच मार्गाच्या अजनी चौकातील वॉकर स्ट्रीटचा आनंद श्री. गडकरी व श्री. फडणवीस यांनी पायी चालून घेतला. मार्गावरून चालत त्यांनी सर्वप्रथम ‘आम्ही नागपुरी’ सेल्फी पॉइंटचे लोकार्पण केले तसेच अजनी चौकातील अमर जवान स्मारकापुढील कोनशिलेचे अनावरण केले. त्यानंतर श्री. गडकरी आणि श्री. फडणवीस यांनी चौकातील करांच्याचे निरक्षण केले. याप्रसंगी श्री. राम कोरके, श्री. मंगेश आंबेरकर, श्रीमती शीला ताले, श्री. चंद्रशेखर कुलकर्णी, श्री. टिचकुले, श्री. गुरुदत्त खातखेडे, सामंत, नामदेवकर यांच्यासह माजी सैनिक व नागरिक उपस्थित होते.

नागपूर शहराच्या सौंदर्यात भर घालणारे अजनी चौकातील क्लॉक टॉवर मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे कमी खर्चात आणि कमी वेळेत भारत सरकारच्या अखत्यारितील एचएमटी लि. कंपनीद्वारे सुरू करण्यात यश आले आहे. या क्लॉक टॉवर येथे पाण्याचे नवीन कारंजे लावण्यात आले आहेत. तर प्रत्येकाला दिसेल अशा दर्शनीय भागात आम्ही नागपुरी हे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले आहे. याशिवाय क्लॉक टॉवर परिसरात एक सुंदर अशी बाग तयार करण्यात आली आहे. तसेच आल्हाददायी रोषणाईने सायंकाळच्या सुमारास विविध रंगाच्या रोषणाईने हे क्लॉक टॉवर चौकतुन ये-जा करण्याच्या वाहनचालकांचे, वाटसरूंचे लक्ष वेधून घेत आहे.