नागपूर : धंतोली पोलीस ठाण्यांतर्गत रहाटे चौकातून एमपीडीएचा आरोपी फरार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. जरीपटका पोलिसांचे पथक त्याला कारागृहात घेऊन जात असताना ही घटना घडली. सिग्नलवर गाडी थांबताच आरोपीने पोलिस कर्मचाऱ्याचा हात झटकला आणि गाडीतून पळ काढला.
पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असला तरी रस्त्यावरील प्रचंड वाहतूक आणि अंधाराचा फायदा घेत तो पळून जाण्यात यशस्वी झाला. या घटनेनंतर पोलीस दलात खळबळ पसरली. मात्र, अद्यापपर्यंत या फरार आरोपीचा कोणताही सुगावा लागला नसून त्यांचा शोध सुरू आहे.
माहितीनुसार, सोमवारी रात्री धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहाटे कॉलनी चौकात काही पोलीस कर्मचारी आरोपींना मध्यवर्ती कारागृहात जमा करण्यासाठी घेऊन जात असताना ही घटना घडली. अजय उर्फ अज्जू राजेश बोरकर असे आरोपीचे नाव असून तो इंदोरा येथील भंडार मोहल्ला येथील रहिवासी आहे.
जरीपटका पोलिसांनी त्याचा गुन्हेगारी रेकॉर्ड पाहता एमपीडीए कारवाई केली होती. पोलिसांनी त्याला अटक करून प्रथम पोलीस आयुक्तालयात नेले तेथून त्याला मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यासाठी नेले जात होते. जरीपटका पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस हवालदार कमलेश यादव, पोलीस कर्मचारी अमित चावरे आणि चालक तुषार पडोळे त्याला मध्यवर्ती कारागृहात घेऊन जात होते.
यावेळी रहाटे कॉलनी चौकात सिग्नल बंद असल्याने पोलिसांचे वाहन थांबले. आरोपी मुरलीधरने पोलिसांच्या तावडीतून हाताला धक्का देऊन स्वतःची सुटका करून घेतली आणि गाडीचा दरवाजा उघडून पळ काढला. आरोपी पळून गेल्यानंतर पोलिस त्याच्यामागे धावले मात्र प्रचंड रहदारी आणि रात्रीची वेळ असल्याने आरोपी तेथून गायब झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकात घबराट निर्माण झाली.
या घटनेची तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या कुख्यात गुन्हेगाराच्या शोधात मंगळवारी दिवसभर विविध पथके त्याचा शोध घेत राहिली. मात्र त्याचा शोध लागलेला नाही.