Published On : Fri, Jul 19th, 2019

विदर्भाच्या सर्वांगीण विकासाला चालना- संचेती

विदर्भ वैधानिक विकास मंडळाची बैठक

नागपूर: विदर्भातील विविध प्रश्नांचा अभ्यास करुन सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी विदर्भ वैधानिक विकास मंडळाची भूमिका असल्याचे प्रतिपादन विदर्भ विकास मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार चैनसुख संचेती यांनी केले.

विदर्भ विकास मंडळाची सन 2019-20 या वित्तीय वर्षातील दुसरी नियमित बैठक विदर्भ विकास मंडळाच्या सभागृहात चैनसुख संचेती यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी अमरावतीचे विभागीय आयुक्त पियुष सिंह, विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव तथा सहसंचालक प्रकाश डायरे, विदर्भ विकास मंडळाचे तज्ज्ञ सदस्य डॉ. किशोर मोघे, डॉ. कपिल चांद्रायण, यशदा, पुणे येथील मानव विकास केंद्राच्या संचालिका श्रीमती डॉ. मिनल नरवणे, विभागीय आयुक्त कार्यालयातील उपायुक्त (नियोजन) धनंजय सुटे, प्रशासकीय अधिकारी ईश्वर निवांत, गोंदियातील सारडा संस्थेचे पंकज देवकर, अमरावती येथील वुमेन्स स्टडी सेंटरच्या संचालिका श्रीमती डॉ. वैशाली गुडधे, वऱ्हाड संस्थेचे धनानंद नागदीवे आदी मान्यवर उपस्थित होते.

विदर्भ विकास मंडळाच्या वतीने मागील बैठकीत दिलेल्या निर्देशानुसार संबंधित जिल्हा विकास अहवालात बदल करुन नवीन प्रारुपाचे सादरीकरण करण्याबाबत अध्यक्ष चैनसुख संचेती यांनी तज्ज्ञ सदस्यांना सुचना केल्यात. वाशिम जिल्हा विकास अहवाल व गोंदिया जिल्हा विकास अहवालाचे यावेळी सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यावर चर्चा होवून जिल्हा विकासाच्या दृष्टीने काही नवीन बाबी निदर्शनास आल्या असल्यास त्या अहवालात समाविष्ट करुन नवीन अहवाल मंडळाकडे सादर करण्यात यावा. ‘गाव तेथे गोदाम’ हा समितीचे तज्ज्ञ डॉ. किशोर मोघे यांचा सुधारित प्रस्ताव नियोजन विभागाकडे सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरच्या वतीने सादर केलेल्या ‘विदर्भातील कुमारी मातांच्या समस्यांच्या अध्ययन अहवाल’ प्रस्तावावर यावेळी चर्चा करण्यात आली. यामध्ये कुमारी मातांवर झालेला सामाजिक व आर्थिक परिणाम यावर अभ्यास करून त्यानुसार सुधारित प्रस्ताव विदर्भ विकास मंडळाला सादर करण्यात यावा, अशी सुचना यावेळी अध्यक्ष श्री. संचेती यांनी केली.

अमरावती येथील वऱ्हाड संस्थेचे अध्यक्ष रविंद्र वैद्य तसेच कोषाध्यक्ष धनानंद नागदीवे यांनी तुरुंगातील कैद्यांचे जीवनमान, त्यांचे प्रश्न, तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अर्थार्जनाच्या समस्या या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली. पुढील प्रशासकीय मान्यतेसाठी हा प्रस्ताव राज्यपाल चे. विद्यासागर यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. पेसा (वनहक्क कायद्याची अंमलबजावणी) याबाबत विदर्भ विकास मंडळामार्फत घ्यावयाच्या अभ्यासाचे विषय व कार्यपध्दतीबाबत तज्ज्ञ डॉ. किशोर मोघे यांनी प्रस्ताव सादर केला. आदिवासी क्षेत्रात वनआधारित रोजगार निर्मिती, वनउपजावर प्रक्रिया उद्योग निर्मिती याबाबत जाणीव जागृती या अभ्यास अहवाल प्रकाशनाबाबत चर्चा करण्यात आली.

वन्यप्राणी तसेच पक्षांमुळे देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. विदर्भातील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी यावर आधारित अहवाल प्रशासकीय मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठविण्यात आला आहे. तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चांद्रायण यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व विदर्भ विकास मंडळ नागपूर यांच्यामध्ये करार (MOU) करण्याबाबतचा मसुदा बैठकीत सादर केला. हा मसुदा तत्वत: मान्य करण्यात आला असून पुढील बैठकीमध्ये हा विषय अंतिम करण्यात येईल,असे अध्यक्ष व सर्व तज्ज्ञ सदस्यांच्या वतीने ठरले.

अध्यक्षांच्या मान्यतेने तसेच तज्ज्ञ समितीच्या वतीने तयार करण्यात आलेले अहवाल विदर्भ विकास मंडळाच्या वतीने शासनाकडे सादर करण्यात येतात. या बहुमुल्य शिफारशीबाबत शासनाच्या वतीने पुढे काय भूमिका घेतल्या जातात याबाबत समिती सदस्यांना अवगत करण्यात यावे, ही अपेक्षा यावेळी समिती सदस्याच्या वतीने व्यक्त करण्यात आली.