Published On : Sat, Nov 10th, 2018

मोटरमनला सू आली, भारतीय रेल्वे मध्येच थांबली

Advertisement

वसई: तुम्ही प्रवासात असाल आणि तुम्हाला जोरात सू ला आलं तर तुम्ही काय कराल? तुम्ही एक्स्प्रेस रेल्वेने प्रवास करत असाल तर काही अडचण येणार नाही. तुम्ही रस्त्याने प्रवास करत असाल तर गाडी बाजूला घेऊन, शौचालय पाहून लघुशंका करु शकता. मात्र जर तुम्ही रेल्वेचे मोटरमन असाल तर?

आज सकाळी साडे दहा वाजता गांधीधाम एक्स्प्रेस ही ट्रेन वसई आणि नालासोपाऱ्यामध्ये थांबवण्यात आली होती. गांधीधाम एक्स्प्रेस थांबवण्याचं कारण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटू शकतं.

ट्रेनच्या मोटरमनला लघुशंका आल्याने त्याने गांधीधाम एक्स्प्रेस मध्येच थांबवली. मोटरमनने एक्स्प्रेस थांबवून तो खाली उतरला आणि त्याने ट्रॅकवर लघुशंका केली. लघुशंका झाल्यावर त्याने एक्स्प्रेस पुढच्या दिशेने मार्गक्रमण केली. या प्रकराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे.

रेल्वेत असलेल्या टॉयलेट्समुळे प्रवाशांना दूरचा प्रवास करताना ‘अडचणी’चा सामना करावा लागत नाही. लघुशंका किंवा शौचाला आल्यास प्रवासी रेल्वेतील टॉयलेटमध्ये जाऊ शकतात. मात्र तीच रेल्वे चालवणाऱ्या मोटरमनला लघुशंका आली तर काय? कारण सर्व प्रवाशांसाठी रेल्वे डब्यात टॉयलेट्स असतात, मात्र मोटरमनला टॉयलेट्सची सुविधा उपलब्ध नसल्याने, मोटरमन्सवर अशा पद्धतीने रेल्वे मध्येच थांबवण्याची वेळ येते.