Published On : Thu, Dec 5th, 2019

‘मातृ वंदना सप्ताह’ आढावा बैठक

नागपूर : शासनाच्या निर्देशानुसार २ ते ८ डिसेंबरदरम्यान संपूर्ण देशामध्ये ‘मातृ वंदना सप्ताह’ साजरा करण्यात येतो. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात २ डिसेंबर रोजी सप्ताहाचे उद्‌घाटन करण्यात आले. सप्ताहात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचा आढावा घेण्यासाठी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच बैठक पार पडली.

शासनाने १ सप्टेंबर २०१७ मध्ये प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत ठराविक निकषांवर गरोदर मातांना पाच हजार रुपयांपर्यंत लाभ दिला जातो. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तथा जनजागृतीसाठी २ ते ८ डिसेंबरदरम्यान मातृ वंदना सप्ताह साजरा करण्यात येतो. नागपूर महानगरपालिकेअंतर्गत साजरा करण्यात येणाऱ्या सप्ताहाचे उद्‌घाटन २ डिसेंबर रोजी आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांच्या हस्ते पार पडले.

या नंतर विविध उपक्रम शहरात राबविले जातात. यासंदर्भात डॉ. सोनकुसळे यांनी आढावा घेतला. प्रधानमंत्री मातृत्व वंदन योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिकेमध्ये ३३४८७ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट आहे. याकरिता नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच हेल्थ पोस्ट येथील आरोग्य सेविका आशामार्फत कार्य केले जाते. मातृ वंदना सप्ताहांतर्गत लाभार्थ्यांची माहिती संकलित करणे व अर्जाची नोंदणी पोर्टलवर करण्यासाठी घरोघरी जाण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी माहिती दिली.


आशांना प्रेरीत करून कार्यक्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांची नोंदणी करून प्रमाण वाढविण्याच्या सूचना आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांनी बैठकीत दिल्या. पोस्ट कार्यालय, आधार कार्ड याबाबत लाभार्थ्यांना येत असलेल्या समस्यांचे निराकरण करून घेण्यासाठी शिबीर आयोजित करीत असल्याची माहिती योजनेचे समन्वयक रज्जू परिपगार यांनी दिली. बैठकीला अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉ. पूर्वाली काटकर तसेच आरोग्य विभागातील सर्व वैद्यकीय अधिकारी व संबंधित कर्मचारी उपस्थित होते.