Published On : Thu, Feb 28th, 2019

नागपूर रडार कंट्रोल एरियामधून अधिक उड्डाणे

नागपूर : भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले एअरबेस बंद केले आहे. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणांचे रुट बदलले आहे. यापैकी बहुतांश विमाने ही नागपूर रडार कंट्रोल एरियामधून जात आहेत. नागपूर एअरपोर्टवर वायु वाहतूक नियंत्रण आणि नेव्हीगेशनची जबाबदारी संभाळणाऱ्या एअरपोर्ट आथॉरिटी ऑफ इंडिया (एएआय) प्रत्येक घडामोडीवर लक्ष ठेवून तयारीत आहे.

नागपूर एअरपोर्ट ट्रॅफिक कंट्रोल एरिया हा नागपूरच्या चारही बाजूंनी ६०० नॉटिकल मॉईलच्या रेंजमध्ये पसरला आहे. या कंट्रोल एरियामधून दररोज जवळपास १३५५ आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय उड्डाणांची ये-जा होत असते. बुधवारी सकाळी ही संख्या अचानक वाढली. मध्य भारतात मोठा कंट्रोल एरिया असलेले नागपूर एअरपोर्ट अनेक सुविधांनीही सज्ज आहे. आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीही पूर्णपणे सक्षम आहे.

बुधवारी सकाळी श्रीनगर, जम्मू, लेह, पठाणकोट, अमृतसह, शिमला, कांगडा, कुल्लू, मनाली आणि पिथोरगड विमानतळावरील संचालन बंद ठेवण्यात यावे, अशी सूचना होती. त्यामुळे रुट बदलण्याची शक्यता आहे. तसेच नागपूर एअरपोर्टवरही काही विमानांचे लँडिंग केले जाऊ शकते. या सर्व गोष्टी पाहता रडार कंट्रोलमध्ये एएआयच्या अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन यावर चर्चा केली. यानंतर मिहान इंडिया लि. (एमआयएल)च्या फायर कंट्रोललाही तयारीसंबंधात अवगत करण्यात आले आहे.

एअर ट्रॅफिकवर लक्ष
परिस्थिती विचारात घेता ‘मॅन पॉवर’ वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. एअर ट्रॅफिकमध्ये होणाºया बदलांवर लक्ष ठेवले जात आहे. दिल्ली, मुंबई व कोलकाता विमानतळाशी नियमित संपर्क साधला जात आहे. सिव्हील एव्हिएशन को-आर्डिनेशन सोबत सुरू आहे.