नवी दिल्ली – केंद्र सरकारकडून मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा संसदेत मांडण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये हे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. दरम्यान, या विधेयकावरून राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक महत्त्वाचं ट्वीट केलं आहे. जुन्या भाषणाचा व्हिडीओ शेअर करत त्यांनी महिला आरक्षणाबाबत दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.
मोदी यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ते महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना दिसत आहेत. यापूर्वी राज्यसभेत मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला मंजुरी न मिळाल्यानंतर देशाला संबोधित करताना त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला होता. देशातील महिलांना राजकीय प्रक्रियेत अधिक सहभाग मिळावा, यासाठी सरकारची भूमिका ठाम असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं होतं.
महिला आरक्षणाच्या मार्गात कितीही अडथळे आले, तरी ते दूर करण्याचा आमचा निर्धार कायम आहे. नारीशक्तीला दिलेलं आश्वासन पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही मोदी यांनी आपल्या भाषणातून सांगितलं होतं.
या व्हिडीओसोबत मोदी यांनी, ‘आम्ही नारीशक्तीला दिलेला शब्द पाळण्यासाठी कटिबद्ध आहोत,’ असा संदेश दिला आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
दरम्यान, सरकारने हे विधेयक पुन्हा संसदेत मांडण्याची तयारी केली असून त्यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं आहे. अशा परिस्थितीत विरोधकांची भूमिका काय असणार, तसेच विविध पक्ष या विधेयकाच्या बाजूने उभे राहणार की विरोध करणार, याकडे आता देशाचं लक्ष लागलं आहे.




