नवी दिल्ली: दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना दिल्लीतल्या कथित मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली. विरोधकांनी सर्व स्तरावर या अटकेचा निषेध केला. इंडिया आघाडीमधील सदस्य असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षानेही या केजरीवाल यांच्या अटकेवरून मोदी सरकारवर ताशेरे ओढले. मोदी सरकार लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम करत आहे. देशभरात भाजपाची दहशत निर्माण केली जात आहे, अशी टीका शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.
दिल्ली सरकारच्या मद्य धोरणावरून केजरीवाल यांना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यात असं धोरण असतं. राज्यांच्या मंत्रिमंडळाला हे धोरण बनवण्याचा अधिकार असतो. हे धोरण बनवणारी एक अधिकृत यंत्रणा असते. कदाचित त्यात काही चुकलं असेल. परंतु, त्यासाठी भाजपाने लोकांमध्ये जाऊन हा प्रश्न उपस्थित करावा, यात काही कायदेशीर बाबी असतील तर न्यायालयात जावे. त्यांनी या प्रकरणी यापूर्वीच दोन-तीन जणांना अटक केली आहे. आता राज्याच्या प्रमुखाला अटक करण्यात आली आहे. राज्याचं धोरण ठरवलं म्हणून अशा प्रकारे अटक करणं चुकीचे आहे.
अरविंद केजरीवाल यांना अटक झाल्यामुळे या घटनेचा परिणाम निवडणुकीवर होईल आणि आगामी निवडणुकीत केजरीवाल यांचे उमेदवार सर्व जागांवर जिंकतील. त्यांचे १०० उमेदवार निवडून येतील. दिल्लीच्या मागील विधानसभा निवडणुकीत भाजपाला केवळ दोन जागा जिंकता आल्या होत्या.
यावेळी त्यांना एकही जागा मिळणार नाही. लोक पुन्हा एकदा केजरीवाल यांच्या बाजूने कौल देतील. तसेच ज्यांनी या सर्व कारवाया केल्या त्यांना मोठी चपराक मिळेल, असेही पवार म्हणाले. दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. परंतु, आम्ही पूर्ण ताकदीने केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहणार असल्याचा शब्दही पवारांनी दिला.