Published On : Sat, Jul 14th, 2018

पारंपरिक व्यवसायासोबतच आधुनिकतेची कास धरा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: कुंभार समाज हा मातीपासून पारंपरिक वस्तू बनवत आला आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही अतिशय चांगली बाब आहे. मात्र आता पारंपरिक वस्तुंच्या निर्मितीसोबतच या समाजाने मातीकला बोर्डाच्या माध्यमातून आधुनिकतेची कास धरावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

राज्य शासनाने वर्धा येथे संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डाच्या निर्मितीला मंजुरी दिली आहे. या निमित्ताने कुंभार समाज महासंघातर्फे रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात राज्य शासनाचा अभिनंदन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. महासंघाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शाल, श्रीफळ व स्मृती चिन्ह देऊन शासनाचे अभिनंदन करण्यात आले.

मंचावर माजी मंत्री शोभाताई फडणवीस, महाराष्ट्र कुंभार समाज महासंघाचे अध्यक्ष सुरेश हिरे, प्रदेशाध्यक्ष संजय गाथे, प्रदेश महिला अध्यक्ष रसिका खेडेकर, नागपूर जिल्हा अध्यक्ष नरेश लुथेले, सुभाष टेहलवाल, गोपाल बनकर, सुरेश कोथे, चंद्रकला चिकाणे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, कुंभार समाजाने 2014 मध्ये वर्धा येथील मेळाव्यात मातीकला बोर्डाची मागणी केली होती. महासंघाच्या या मागणीची राज्य शासनाने आश्वासनपूर्ती केली आहे. वर्धा येथे स्थापन करण्यात येणाऱ्या संत शिरोमणी गोरोबाकाका मातीकला बोर्डाकरीता अर्थसंकल्पात 10 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या बोर्डाचे कामकाज तत्काळ सुरू होण्याकरीता शासन स्तरावर कार्य सुरू आहे. या माध्यमातून आधुनिक व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल.

सध्या जगात वाढलेल्या औद्योगिकीकरणामुळे प्रदुषणाची समस्या वाढली आहे. या प्रदुषणाला आळा घालण्यासाठी शासनाने राज्यात प्लास्टीकबंदी केली. मातीपासून शिल्प, कलाकृती व रोजच्या उपयोगाच्या वस्तू बनविण्याची कला कुंभार समाजाच्या अंगी असल्यामुळे या समाजाला फार महत्व प्राप्त होणार आहे, अशा शब्दात त्यांनी समाजाचे कौतुक केले.

कुंभार समाजाने नवीन पिढीपर्यंत हा व्यवसाय पोहोचवून देश विदेशात नाव लौकीक मिळवावा, याकरीता शासन कौशल्य विकासाचे कार्यक्रम राबवित आहे. या माध्यमातून नवीन पिढीला नवनवीन प्रशिक्षण घेण्यास मदत होईल. कुंभार समाजाच्या इतर मागण्यांबाबत लवकरच मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावून प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी संजय गाथे म्हणाले, शासनाने कुंभार समाजाची मागणी पूर्ण करून या समाजाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम केले आहे. कुंभार समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने केलेल्या प्रयत्नाबद्दल त्यांनी समाजाच्यावतीने शासनाचे अभिनंदन करून आभार मानले.

प्रास्ताविक नरेश लुथेले यांनी तर संचालन चंदन प्रजापती यांनी केले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.