Published On : Wed, Aug 14th, 2019

मॉर्डन स्कूल, स्कूल ऑफ स्कॉलर्स व सांदीपनी ‘महापौर चषका’चे मानकरी

‘महापौर चषक’ वंदे मातरम्‌ समूहगान स्पर्धेचा समारोप

नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या क्रीडा, शिक्षण व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित ‘महापौर चषक’ वंदे मातरम् समूहगान स्पर्धेच्या अंतिम फेरीत मॉर्डन स्कूल कोराडी रोड, स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट व सांदीपनी स्कूल हजारीपहाड या शाळांचे संघ अनुक्रमे पहिल्या इयत्ता ९वी ते १०वी, दुस-या इयत्ता ६वी ते ८वी व तिस-या इयत्ता पहिली ते पाचवी या गटातून प्रथम क्रमांक पटकावून ‘महापौर चषका’चे मानकरी ठरले. तिन्ही गटातील विजेत्या संघाला शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे व अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘महापौर चषक’, १० हजार रुपये रोख व भेट वस्तू प्रदान करण्यात आल्या.

बुधवारी (ता.१४) सिव्हील लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहामध्ये स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. गट क्रमांक एक इयत्ता ९वी ते १०वी, गट क्रमांक दोन इयत्ता ६वी ते ८वी व गट क्रमांक तीन इयत्ता पहिली ते पाचवी या तिन्ही गटातील विजेत्या, उपविजेत्या, तृतीय क्रमांकप्राप्त संघांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. पुरस्कार वितरण समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती प्रमोद चिखले, शिक्षण समिती उपसभापती प्रमोद तभाने, आरोग्य समिती उपसभापती नागेश सहारे, शिक्षण समितीच्या सदस्या प्रमिला मथरानी, सुषमा चौधरी, शिक्षणाधिकारी प्रिती मिश्रीकोटकर, अंतिम फेरीचे परीक्षक सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, दीगंबर पिंपळघरे, चंद्रकांत पिंपळघरे आदी उपस्थित होते.

तत्पूर्वी मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते स्पर्धेच्या अंतिम फेरीचे उद्घाटन झाले.

अंतिम फेरीत गट क्रमांक एक इयत्ता ९वी ते १०वी या गटात मॉर्डन स्कूल कोराडी रोड संघाने प्रथम क्रमांक पटकावून स्पर्धेमध्ये बाजी मारली. भवन्स बी.पी. विद्या मंदिर संघ उपविजेता ठरला. या संघाला चषक, सात हजार रुपये रोख व भेटवस्तू देण्यात आल्या. नागपूर महानगरपालिकेच्या बॅरीस्टर शेषराव वानखेडे विद्यानिकेतन संघाने तिसरा क्रमांक पटकावला. संघाला चषक, पाच हजार रुपये रोख व भेटवस्तू प्रदान करुन गौरविण्यात आले. तर बी.आर.एस. मुंडले साउथ अंबाझरी शाळेला चषक, तीन हजार रुपये रोख व भेटवस्तू असे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले.

गट क्रमांक दोन इयत्ता ६वी ते ८वी गटामध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्स अत्रे लेआउट संघ विजेता ठरला. तर साउथ पॉईंट स्कूल ओंकार नगर संघाने उपविजेतेपद राखले. उपविजेत्या संघाला चषक, सात हजार रुपये रोख व भेटवस्तू देण्यात आल्या. भारतीय विद्या भवन्स त्रिमूर्ती नगर संघाने तिसरे स्थान प्राप्त केले. संघाला चषक, पाच हजार रुपये रोख व भेटवस्तू तर प्रोत्साहन बक्षीस पटकाविणा-या दुर्गा नगर माध्यमिक शाळा मनपा या संघाला चषक, तीन हजार रुपये रोख व भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या.

इयत्ता पहिली ते पाचवीच्या गट क्रमांक तीनमध्ये सांदीपनी हजारीपहाट संघाने पहिले स्थान पटकावून वंदे मातरम् समूहगान स्पर्धेचा ‘महापौर चषक’ उंचावला. स्कूल ऑफ स्कॉलर्स बेलतरोडी संघ उपविजेता ठरला. या संघाला चषक, सात हजार रुपये रोख व भेटवस्तू प्रदान करुन गौरविण्यात आले. भारतीय विद्या भवन्स श्रीकृष्ण नगर संघाने तृतीय क्रमांक मिळविला. संघाला चषक, पाच हजार रुपये रोख व भेटवस्तू देण्यात आल्या. तर विवेकानंद हिंदी प्राथमिक शाळा मनपा संघाला प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आले. चषक, तीन हजार रुपये रोख व भेटवस्तू प्रदान करून संघाला सन्मानित करण्यात आले.

परीक्षकांचा सत्कार

‘महापौर चषक’ वंदे मातरम् स्पर्धेच्या तिन्ही गटातील अंतिम फेरीचे निष्पक्ष परीक्षण करून निकाल देणा-या परीक्षकांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. अंतिम फेरीमध्ये परीक्षकाची भूमिका निभावणारे सुरमणी पं. प्रभाकर धाकडे, दीगंबर पिंपळघरे, चंद्रकांत पिंपळघरे यांच्यासह प्राथमिक फेरीचे परीक्षण करणारे अश्वीन खापर्डे, मिलींद जिभे, मेधा हरीदास, विजय बोरीकर, संकेत नागपुरकर या परीक्षकांनाही मान्यवरांनी शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह प्रदान करुन सन्मानित केले. ९ ते १३ ऑगस्ट दरम्यान झालेल्या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीमध्ये डॉ. रश्मी रायटर, भीमराव भुरे, आकांक्षा नगरकर, सुधीर वायकर यांनीही निष्पक्ष परीक्षणाद्वारे उत्तम निकाल दिला.

कार्यक्रमाचे संचालन क्रीडा निरीक्षक नरेश चौधरी यांनी केले तर आभार संध्या पवार यांनी मानले. ‘महापौर चषक’ वंदे मातरम् स्पर्धेच्या आयोजनाकरीता अरुणा गावंडे, अंजली कावळे, प्रतिभा दिवाटे, गेंदलाल बुधबावरे, साहेबराव गावंडे यांच्यासह शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या अधिकारी व कर्मचा-यांनी सहकार्य केले.