नागपूर – सहकार नगर परिसरातील अवैध चिकन-मटन विक्रीच्या विरोधात अखेर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना थेट कोंबड्यांची भेट देत निषेध व्यक्त केला. गेल्या अनेक महिन्यांपासून स्थानिक नागरिकांच्या तक्रारी असूनही महापालिकेचे दुर्लक्ष सुरुच राहिल्यामुळे संतप्त मनसे कार्यकर्त्यांनी झोन-एकच्या कार्यालयात जाऊन सहाय्यक आयुक्त चौधरी यांना या प्रकारची ‘जिवंत आठवण’ करून दिली.
या आंदोलनामध्ये मनसेचे राज्य सरचिटणीस हेमंत गडकरी आणि नागपूर शहर उपाध्यक्ष तुषार गिर्हे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सहाय्यक आयुक्तांना निवेदन दिले. त्यांनी अवैध मार्केटमुळे परिसरात निर्माण झालेली दुर्गंधी, भटक्या कुत्र्यांचा त्रास, अपघातांची वाढ व एका महिलेचा मृत्यू या मुद्द्यांवर जोरदार चर्चा केली. यावेळी विक्रेत्यांची ओळख, त्यांचे नागरी तपशील मनपाकडे नसल्याचा सवालही उपस्थित करण्यात आला.
संबंधित विक्रेते कोण आहेत, त्यांना परवानगी आहे का, असा सवाल करत मनसे शिष्टमंडळाने चेतावणी दिली की, जर लवकरच हे अवैध मार्केट हटवले नाही, तर आम्हीच झोन कार्यालयाच्या परिसरात अशा प्रकारचे मार्केट सुरू करू. त्यानंतर सहाय्यक आयुक्त श्री. चौधरी यांनी तातडीने कारवाईचे आश्वासन दिले.
या आंदोलनात मनसेचे वाहतूक सेनेचे राज्य उपाध्यक्ष सचिन धोटे, विभाग अध्यक्ष हर्षल दसरे, महिला आघाडीच्या रोशनी खोब्रागडे, प्रिया बोरकुटे, गुंजन पांगुळ, कुंदा मानकर, चेतन शिराळकर, रामोजी खोब्रागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.
मनसेच्या या ‘कोंबडी भेट आंदोलनाने’ महापालिकेच्या दुर्लक्षाविरोधात एक वेगळ्या प्रकारचा आवाज उठवला असून आता प्रशासनाच्या कृतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.