नागपूर : मागील पाच वर्षात नागपुरातून बेपत्ता झालेल्या 639 महिलांचा अद्यापही शोध लागलेला नाही. नागपूर टुडेला प्राप्त केलेल्या आकडेवारीतून ही धक्कादायक माहिती समोर आली. नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2019 ते 2023 या कालावधीत राज्याच्या दुसऱ्या राजधानीतून एकूण 8,466 महिला बेपत्ता झाल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकडेवारीनुसार 7857 महिलांचा शोध घेण्यात आला.तर 639 महिला अद्यापही बेपत्ता आहेत. 2019 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार 1,970 महिला बेपत्ता झाल्या होत्या, यातील 1,859 यशस्वीरित्या शोधण्यात पोलिसांना यश आले. तर 109 महिला अद्यापही सापडल्या नाही. 2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान बेपत्ता होणाऱ्या महिलांच्या आकडेवारीत किंचित घट झाली. याकाळात 1,343 महिला बेपत्ता झाल्या होत्या. यातील 1,250 महिलांचा शोध लागला तर 93 जणींचा अजूनही शोध लागलेला नाही.
2021 मध्ये लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे, संख्या पुन्हा वाढली. यादरम्यान 1,648 महिला बेपत्ता झाल्या, 1,513 शोधल्या गेल्या तर 167 महिलांचा शोध लागलेला नाही. तसेच 2022 मध्येही हरवलेल्या महिलांच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली. 2022 मध्ये, 1,809 महिला बेपत्ता झाल्या, त्यापैकी 1,634 महिलांचा शोध लागला, तर तब्बल 175 महिला बेपत्ताच आहेत.
2023 मध्ये या प्रकरणांमध्ये पुन्हा घट झाली. यादरम्यान 1,696 महिला बेपत्ता झाल्याची नोंद झाली. तर यातील 1,601 महिलांचा शोध लागला.तर 95 महिला अद्यापही सापडल्या नाहीत.
नागपुरात 2019 ते मे 2023 या कालावधीत 7,413 महिला आणि 1,469 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, तत्कालीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी मानवी तस्करी विरोधी युनिट (AHTU) स्थापन करून निर्णायक कारवाई केली. यामुळे हरवलेल्या मुलींना शोधण्यात मोठी मदत झाली आहे. मात्र उर्वरित 639 बेपत्ता महिलांचा शोध घेण्यास पोलीस प्रशासन कामाला लागले आहे.
मुली आणि महिला बेपत्ता प्रकरणात चिंतेची बाब म्हणजे प्रेम प्रकरणासाठी बळजबरीने अल्पवयीन मुलींना पळवून नेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.याव्यतिरिक्त, कौटुंबिक वादातून पळून जाणाऱ्या मुलींचाही यात समावेश होतो. इतकेच नाही मुलींना वेश्याव्यवसाय, अंमली पदार्थांचे सेवन किंवा गुन्हेगारी कृत्यांमध्ये जबरदस्तीने ढकलले गेल्याचेही समोर आले.
मानवी तस्करीचा सामना करण्यासाठी AHTU ची स्थापना करण्यात आली आहे. उर्वरित ‘लापता लेडीज’चा शोध सुरू असताना, नागपुरातील मुली आणि महिलांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करण्यासाठी समाज, अधिकारी आणि संबंधितांनी जवळून सहकार्य करणे गरजेचे आहे. सामाजिक समस्या, कौटुंबिक विवाद आणि गुन्हेगारी नेटवर्क या कारणांमुळे या महिला बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये भर पडत आहे.
– शुभम नागदेवे