Oops! It appears that you have disabled your Javascript. In order for you to see this page as it is meant to appear, we ask that you please re-enable your Javascript!
  | | Contact: 8407908145 |
  Published On : Thu, Apr 8th, 2021

  गैरकारभार आणि न्यायालयीन प्रकरणात वाभाडे

  लोकांचे लक्ष हटविण्यासाठी लसीकरणावर राजकारण : देवेंद्र फडणवीस

  मुंबई: विविध प्रकरणांमध्ये महाविकास आघाडी सरकारची होत असलेली नाचक्की आणि स्वत:चा गैरकारभार या दोन्हींपासून नागरिकांचे लक्ष विचलित करण्यासाठीच कोरोना लसीकरणावर नाहक राजकारण केले जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

  राज्यातील कोरोना आणि लसीकरण हे महत्त्वाचे प्रश्न आहेतच. परंतू आज व्हेंटिलेटर्स उपलब्ध नाहीत, रेमडेसिवीर उपलब्ध नाही, ऑक्सिजन उपलब्ध नाही, साधे बेड सुद्धा उपलब्ध नाही आणि या सार्‍या तर राज्य सरकारच्या अखत्यारीतील बाबी आहेत. मुळात राज्य सरकार आपली जबाबदारी पूर्ण करत नाही. केंद्र सरकारकडून लस येत आहेत, येत राहतील. पण, प्राथमिक सेवाही देता येत नसताना भयावह स्थिती निर्माण होऊ शकते. याकडे मुख्यमंत्री आणि मंत्री लक्ष देणार का, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

  देवेंद्र फडणवीस यांनी आज केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला आणि त्यानंतर त्यासंदर्भात माहिती देताना ते म्हणाले की, केवळ तीन राज्यांनाच 1 कोटीपेक्षा अधिक लस प्राप्त झाल्या आहेत. त्यात महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांचा समावेश आहे. यात गुजरात आणि राजस्थानची लोकसंख्या समान. (राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार) लसींचा पुरवठा हा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसिकरणातील कामगिरीच्या आधारावर होतो आहे. महाराष्ट्राला 1.06 कोटी लस प्राप्त झाल्या. तसे ट्विट डीजीआयपीआरने 6 एप्रिल रोजी केले आहे. 91 लाख लसी वापरल्या. म्हणजे 15 लाख लस शिल्लक आहेत. मग, आज जाणिवपूर्वक केंद्र बंद करून लसींबाबत चुकीच्या बातम्या पसरविण्याचे कारण काय? आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लसी पुरवठ्याच्या मार्गात (पाईपलाईनमध्ये) आहेत, तो पुरवठा 9 ते 12 एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिकच्या 19 लाख लस मिळणार आहेत.

  उत्तर प्रदेश हे सर्वांत मोठे राज्य आहे. त्यांना 92 लाख लसींचे डोज मिळाले आहेत. त्यांनी 83 लाख डोज वापरले आहेत आणि 9 लाख लसींच्या मात्रा त्यांच्याकडे शिल्लक आहेत. हरयाणाला पहिल्या पाईपलाईनमध्ये फारसे डोज मिळाले नव्हते. त्यांना आता डोज प्राप्त होत आहेत. महाराष्ट्राशी भेदभाव होणार नाही आणि कामगिरीच्या आधारावर तत्काळ पुरवठा होईल, असे केंद्रीय मंत्र्यांनी मला आश्वस्त केले आहे. श्री शरद पवार यांनी सुद्धा केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांच्याशी चर्चा केली. त्यांना संपूर्ण वस्तुस्थिती केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी अवगत करत आश्वस्त केले. कोरोनाविरोधातील लढाईत पहिल्या दिवसापासून केंद्र सरकारने सर्व राज्यांना सोबत घेऊन ही लढाई लढली आहे आणि महाराष्ट्राला सर्वाधिक मदत दिली आहे. आजही केंद्र सरकार महाराष्ट्राच्या खांद्याला खांदा लावून सर्व ती मदत करते आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.


  Stay Updated : Download Our App
  Mo. 8407908145