Published On : Sat, Apr 22nd, 2017

Bhandara: घर सोडून प्रियकराकडे आलेल्या अल्पवयीन तरुणीवर प्रियकरासह त्याच्या 6 मित्रांचा सामूहिक अत्याचार


भंडारा (Bhandara):
आईसोबत भांडण करून प्रियकराकडे आलेल्या एका 17 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यात उघडकीस आली आहे. या प्रकरणी 6 युवकांना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी फरार आहे. अटकेत असलेल्या आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पीडित मुलगी ही भंडारा जवळच्या दाभा इथली रहिवाशी आहे. तिचं आईसोबत भांडण झाल्यानं ती 13 एप्रिलला घराबाहेर निघून गेली. तिच्या गावाशेजारीच पांढराबोडी ही गाव आहे. या गावात तिचा प्रियकर राकेश भिवगडे राहतो. 13 तारखेला घरून निघाल्यानंतर ती पांढराबोडीला तिच्या प्रियकराकडे आली. तिथं त्यानं पीडित तरुणीवर जबरदस्तीनं शारीरिक अत्याचार केला.

इतक्यावरच तो नराधम थांबला नाही, तर त्यानं त्याच्या 6 मित्रांनाही बोलावून घेतलं. पीडित तरुणीला त्यानं पांढराबोडीच्या जंगलात नेलं. तिथं त्यानं आणि त्याच्या 6 मित्रांनी पीडित तरुणीवर 13 एप्रिल ते 16 एप्रिल असा चार दिवस सतत अत्याचार केला. 17 एप्रिलला या सर्व नराधमांनी तिला जखमी अवस्थेत दाभा गावाशेजारच्या एका शेतात सोडून दिलं.

दुसरीकडे मुलगी घरून निघून गेल्यानं पीडित मुलीच्या आईनं 14 एप्रिल रोजी वरठी पोलिसात तक्रार दाखल केली. 17 तारखेला पीडित मुलगी दाभा गावाजवळच्या एका शेताजवळ बेशुद्ध अवस्थेत पडलेली दिसली. गावकऱ्यांनी ही बाब पोलिसांना कळवीत घटनेची माहिती दिली. शुद्धीवर आल्यावर मुलीने सर्व घटना आईला आणि पोलिसांना सांगितली.


ही सर्व घटना ऐकून पोलीस आवाक झाले. त्यांनी मुलीची वैद्यकीय तपासणी करत वरठी पोलीस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी 6 आरोपींना अटक केली असून यामध्ये अंकित चौहान, अर्पित लोणारे, राकेश भिवगडे, इम्तियाज शेख, बाबू हलदार, सुहास लांजेवार या जणांचा समावेश आहे, तर धम्मा नागदेवे हा आरोपी फरार आहे.