Published On : Wed, Jun 23rd, 2021

भरधाव कारच्या धडकेत मायलेकाचा जागीच अपघाती मृत्यू

कामठी :-स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या लिहिगाव पोलीस चौकीच्या समोरील महामार्गावर एका भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती कारच्या चालकाने सारख्याच दिशेने जात असलेल्या दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत माय लेकाचा जागीच अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी 10 दरम्यान घडली असुन मृतकामध्ये मनीषा गोपाल खुरपडी (आई)वय 22 वर्षे व अनिकेत गोपाल खुरपडी वय 42 वर्षे (मुलगा) दोन्ही राहणार गादा तालुका कामठी असे आहे.तर आरोपी वाहनचालकाने घटनास्थळाहुन पळ काढण्यात यश गाठले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतक हे मुलगी पल्लवी च्या सासरगावी असलेल्या उमरेड तालुक्यातील वडद गावातील मुलीच्या घरी भेट घालून एकटीवा क्र एम एच 40 बी एम 3914 ने लिहिगाव मार्गे गादा गावी येत असता सारख्याच दिशेने मागेहून येणाऱ्या भरधाव मारुती कार क्र एम एच 49 बी के 1711 च्या चालकाने दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीस्वार मुलगा व त्याची आई गंभीर अपघाती जखमी होऊन जागीच मरण पावले.

तर आरोपी वाहनचालकाने घटनास्थळी पोलीस येण्यापूर्वीच पळ काढला .घटनेची माहिती मिळताच नवीन कामठी पोलीस स्टेशन चे एपीआय सुरेश कन्नके व सह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेऊन दोन्ही मृतदेहाच्या पार्थिवावर कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.पोलिसांनी आरोपी वाहनचालक विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.