Published On : Mon, May 11th, 2020

नागपुरातील क्वारंटाईन केंद्र असलेल्या आमदार निवासात जेवणावरुन गोंधळ

Advertisement

नागपूर : संस्थात्मक ‘क्वारंटाईन’ केंद्र असलेल्या आमदार निवासातील जेवण व नाश्त्याचे कंत्राट संपल्याने क्वॉरंटाईन असलेल्या संशयितांना रविवारी सकाळी ८ वाजता दिला जाणारा नाश्ता सकाळी ११ वाजता तर दुपारचे १२ वाजताचे जेवण सायंकाळी ४ वाजता मिळाले. या प्रकारावरून आमदर निवासात चांगलाच गोंधळ उडाला.

आमदार निवासात ४५० हून अधिक संशयित ‘क्वॉरंटाईन’ आहेत. यांच्या दोन वेळचे जेवण, दोन वेळचा नाश्ता व चहाचे कंत्राट आमदार निवासातील कंत्राटदाराला देण्यात आले होते. परंतु आज या कंत्राटदाराचे कंत्राट संपले. यामुळे सकाळचा नाश्ता व जेवणाचे कंत्राट दुसऱ्या पुरवठादाराला देण्यात आले. परंतु पहिल्याच दिवशी त्याने उशीर केला. येथे ‘क्वारंटाईन’ असलेल्या एकाने ‘लोकमत’ला फोन करून सांगितले, सकाळचा ८ वाजता मिळणारा नाश्ता १०.३० ते ११ वाजताच्या दरम्यान मिळाला.

हा नाश्ता अस्वच्छ वाहनातून आणण्यात आला होता. त्याचा दर्जा चांगला नव्हता. जुना कंत्राटदार प्रत्येकाच्या खोलीपर्यंत जेवण नेऊन द्यायचा, परंतु नव्या कंत्राटदाराने खालीच नाश्त्याचे साहित्य ठेवल्याने अनेकांना अडचणीचे गेले. याला घेऊन गोंधळ उडाला. यामुळे येथील अधिकाऱ्यांनी पोलिसांना सूचना दिली. शीघ्र कृती पथकही तैनात करण्यात आले. दुपारचे जेवणही ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान आले. खोलीत पोहचायलाही बराच वेळ लागला.

या संदर्भात उपविभागीय अधिकारी शेखर गाडगे म्हणाले, जुन्या कंत्राटदाराचे दर खूप जास्त होते. यामुळे आजपासून नवीन कंत्राटदार नेमण्यात आला. परंतु त्याला सेवा देणे शक्य होत नसल्याचे दिसून आले. त्याच्याकडून सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण देण्यात आले. यात थोडा उशीर झाला. यामुळे हा कंत्राटदार बदलवून नव्या कंत्राटदाराला नाश्ता, चहा, व भोजनाचे कंत्राट देण्यात आले. आता सर्वकाही सुरळीत असल्याचेही गाडगे म्हणाले.

स्वच्छता व पाण्याची समस्या
आमदार निवासात ‘क्वारंटाईन’ असलेल्या दोन युवकांनी एक व्हिडीओ व्हायरल करून येथे पाण्याची समस्या असल्याचे सांगितले. तसेच सफाई नियमित होत नसल्याचीही तक्रार केली. विशेष म्हणजे, नमुन्याचा अहवाल लवकर मिळत नाही. जे पॉझिटिव्ह रुग्ण आले आहेत त्यांचा अहवालाही उशिरा येत असल्याने त्यांच्यापासून इतरांना लागण होण्याची भीती असल्याचेही त्यांनी व्हिडीओत म्हटले आहे.