
नागपूर : गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मतीमंद २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपीची ओळख पटवून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मतीमंद असून ती आपल्या कुटुंबासोबत गणेशपेठ परिसरात राहते. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी शैलेश मधुसूदन पंडिया हा त्याच परिसरात राहतो व इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करतो. सुमारे तीन महिन्यांपूर्वी तो पीडितेच्या वडिलांच्या घराजवळ इलेक्ट्रिक फिटिंगचे काम करण्यासाठी आला होता.
७ नोव्हेंबरच्या दुपारी आरोपी विनापरवानगी घरात घुसला आणि घरात कोणी नसल्याचा फायदा घेत मतीमंद तरुणीवर जबरदस्ती बलात्कार केला. संध्याकाळी कुटुंबीय घरी आल्यानंतर ही घटना उघड झाली. तात्काळ पीडितेच्या आईने गणेशपेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या बलात्कारासंबंधी कलमांनुसार गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास गणेशपेठ पोलीस करत आहेत.








