Published On : Fri, May 12th, 2017

‘कुठली समस्या तर नाही ना?’, महापौरांनी केली कर्मचाऱ्यांची आस्थेने चौकशी : लेटलतिफांना तंबी


नागपूर:
नागपूरच्या महापौर नंदा जिचकार यांनी आज (ता. १२) सकाळी १० वाजता अचानक महापालिका नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या विविध विभागाच्या कार्यालयात ‘एंट्री’ केली. ‘कुठल्या समस्या तर नाही ना? असेल तर बिनधास्त सांगा. आपल्या इमारतीला स्वच्छ आणि सुंदर ठेवा’ अशी आस्थेने चौकशी करीत प्रेमाचा सल्ला देत लेटलतीफ कर्मचाऱ्यांना यापुढे वेळेत येऊन कार्यालयीन शिस्त पाळण्याची तंबी दिली.

महापौर नंदा जिचकार यांनी अचानक केलेल्या या निरीक्षण दौऱ्याने सारेच बुचकाळ्यात पडले. स्वच्छतागृहापासून इमारतीतील स्वच्छता, पार्किंगची व्यवस्था, अग्निशमन विभागाच्या भंगारात असलेल्या गाड्या आदींचीच त्यांनी चौकशी केली. सहायक आयुक्त महेश धामेचा आणि निगम सचिव हरिश दुबे यांनी महापौर नंदा जिचकार यांना सर्व विभागाच्या रचनेची आणि कार्याची माहिती दिली. महापौर नंदा जिचकार यांनी अधिकाऱ्यांना काही सूचना केल्यात. महापालिकेच्या इमारतीत येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कुठले कार्यालय कुठल्या माळ्यावर आहे, तेथील जबाबदार अधिकारी कोण याची माहिती असलेला फलक आयुक्त कार्यालयासमोरील दर्शनी भागात लावावा, अशा सूचना त्यांनी केल्यात. इमारतीतील स्वच्छता गृहांचीही पाहणी करीत, दररोज त्याची स्वच्छता करण्याचे निर्देश दिलेत. स्वच्छतागृहासंदर्भात आपल्याकडे अनेक तक्रारी आल्याचे महापौरांनी सांगितले. त्याची दखल तातडीने घेत त्यांनी सदर निर्देश दिलेत. पिण्याचे पाणी ज्या ठिकाणी आहे, ते ठिकाण नियमित स्वच्छ ठेवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिलेत.

उशिरा येणाऱ्यांना मिळणार कारणे दाखवा नोटीस
नागपूर महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या दौऱ्यादरम्यान सकाळी १० वाजता बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर हजर असल्याचे महापौर नंदा जिचकार यांना दिसले. मात्र, जे कर्मचारी वारंवार उशिरा येत असेल अशांना तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावा, असे निर्देश त्यांनी सहायक आयुक्त महेश धामेचा आणि निगम सचिव हरिश दुबे यांना दिलेत. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना महापौरांनी त्यांना वेळेचे बंधन पाळण्याचे आवाहन केले.

कार्यालयातून करू स्वच्छतेला सुरुवात
स्वच्छता अभियानात नागपूर माघारल्याची अनेक कारणे आहेत. रेल्वे स्थानक, बस स्थानक आदी ठिकाणच्या स्वच्छतेत गुणांकन कमी मिळाले. ती त्या-त्या प्रशासनाची जबाबदारी आहे. सर्वांनी आपली जबाबदारी सामूहिकपणे पार पाडली तर स्वच्छतेचे उत्तम उदाहरण म्हणून भविष्यात नागपूरकडे बघितले जाईल. त्यामुळे आपली जबाबदारी म्हणून आपले कार्यालय स्वच्छ राहावे यासाठी आमची धडपड आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छता ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, हे समजून घेऊन महापालिका कार्यालय स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटके ठेवण्यासाठी आपण स्वत: पुढाकार घेतल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी सांगितले.


झोन कार्यालयालाही देणार अचानक भेटी
महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी केलेल्या अचानक दौऱ्याने साऱ्यांनाच धक्का बसला. नागरिकांशी थेट जुळलेला महानगरपालिकेतील कर्मचारी त्यांची जबाबदारी योग्यरीत्या पार पाडतच आहेत. त्यात अधिक सुसूत्रता यावी आणि येणारा प्रत्येक नागरिक येथून समाधानी होऊन जायला हवा, हा या दौऱ्यामागचा उद्देश होता. यापुढे प्रत्येक झोन कार्यालयालाही महापौर नंदा जिचकार अशाच अचानक भेटी देणार असल्याचे त्यांनी सांगितले.