Published On : Thu, Jun 28th, 2018

विकासकामाकरिता केलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे : महापौर

Advertisement

नागपूर : शहरात विविध संस्थांतर्गत विकास कामे सद्यपरिस्थितीत सुरू आहे. पावसाळा सुरू झाला आहे. चार जुलैपासून पावसाळी अधिवेशनही सुरू होत आहे. त्यापूर्वी शहरातील विकासकामाकरिता केलेले खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

शहरातील विविध विकासकामाचा आढावा घेण्यासाठी महापौर नंदा जिचकार यांनी गुरूवारी (ता.२८) ला मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख सभागृहात मेट्रो रेल्वे, नासुप्र, मनपा यांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पार पडली.

यावेळी स्थायी समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, स्थापत्य व प्रकल्प समिती सभापती संजय बंगाले, मनपाचे उपनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, वर्षा ठाकरे, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, प्रभारी मुख्य अभियंता मनोज तालेवार, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड, कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक, डी.डी.जांभूळकर, सी.जी. धकाते, परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) अनिरूद्ध चौगंजकर, एल ॲण्ड टी चे धनंजय कोंडावार, नागपूर मेट्रो रेल्वेचे अरूण सक्सेना, स्वामीनाथन एस., के. सुशील कुमार, एन.व्ही.पी.विद्यासागर प्रामुख्याने उपस्थित होते.

शहरामध्ये सुरू असलेल्या सीमेंटच्या रस्त्यांचा आणि हॉटमिक्सच्या कामाचा झोननिहाय आढावा महापौर नंदा जिचकार यांनी कार्यकारी अभिंयत्यांमार्फत घेतला. नागपूर मेट्रो रेल्वेच्या प्रगतीपथावर असलेल्या आणि पूर्ण झालेल्या कामाची स्थितीबाबत आढावा महापौरांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून घेतला. मेट्रो रेल्वेने शहरात काम सुरू असताना मनपाच्या स्थानिक अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे आवश्यक आहे. त्यांच्याशी समन्वय न साधल्याने मोठ्या समस्या निर्माण होत आहे. यासाठी सातत्याने सर्व विभागांत समन्वय असणे आवश्यक आहे. यानंतर मेट्रो रेल्वे मनपाच्या जलप्रदाय, आरोग्य, बांधकाम विभाग यांच्याशी समन्वय साधत काम करेल, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

ज्या भागात काम सुरू आहे, त्या भागातील नगरसेवक व झोन सहायक आयुक्तांना बांधकामाबाबत सूचित करावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. ४ जुलै पासून पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात यावे, याशिवाय पावसाळा सुरू झाला आहे. नागरिकांच्या सातत्याने तक्रारी येत आहे, त्यामुळे खड्डे तातडीने बुजविण्यात यावे, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

मेट्रो रेल्वेने बांधकाम करताना कुठे पाईपलाईन आहे, कुठे सीवर लाईन, गडर लाईन आहे या माहितीसाठी मनपाच्या जलप्रदाय, ओसीडब्ल्यू, आरोग्य या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत संयुक्तिक दौरा करावा, अशा सूचना महापौर नंदा जिचकार यांनी केल्या. जियोद्वारे करण्यात आलेल्या कामाचा आढावा यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी घेतला.