नागपूर: नागरिकांना कुष्ठरोग व त्यामुळे येणा-या विकलांगतेपासून दूर ठेवून याबद्दल जनजागृती करण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री प्रगती योजनेअंतर्गत नागपूर महानगरपालिका व राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमाअंतर्गत कुष्ठ रुग्ण शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे. 5 सप्टेंबर ते 20 सप्टेंबर दरम्यान राबविण्यात येणा-या मोहीमेला महापौर नंदा जिचकार यांनी हिरवी झेंडी दाखविली. प्रामुख्याने आरोग्य सेवा नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. हेमंत निंबाळकर, मनपा आरोग्य अधिकारी अनिल चिव्हाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, वैद्यकिय अधिकारी (कुष्ठरोग विभाग) डॉ. संजय मानेकर, डॉ. अनुपमा रेवाळे, डॉ. अनंत हजारे, डॉ. भोजराज मडके, डॉ. हेमलता वर्मा, डॉ. फातेमा शाफिया उपस्थित होते.
या कार्यक्रमाअंतर्गत एक प्रशिक्षक पुरुष व एक महिला असे दोन जणांचे 424 चमू स्लम भागातील घरोघरी जाऊन 60 टक्के शारिरीक तपासणी करणार आहे. यामध्ये एखाद्या नागरिकाच्या शरिरावर कुष्ठरोगाचे लक्षण आढळ्यास त्याला रेफर स्लीप देऊन रुग्णालयाला पाठविण्यात येईल. या संशयित रुग्णाची स्क्रीनींग रुग्णालयात करण्यात येईल. यामध्ये कुष्ठरोग आढल्यास रुग्णाला निशुल्क औषध आणि उपचार सेवा मिळेल. या 424 चमूवर मनपाच्या 110 एएनएम नेतृत्व करणार आहे.
कुष्ठरोगमुक्त समाज साकारण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा कार्यक्रम राबविण्यात येतो. दरवर्षी सुमारे 250 नवीन रुग्ण शोधण्यात येतात. कुष्ठरोगाचे लक्षण आढल्यास प्राथमिक टप्प्यात यावर उपचार करणे सहज शक्य आहे. शिवाय सुरुवातीला असंसर्ग असलेला हा प्रकार वेळीच उपचार मिळाले नसल्यास संसर्गजन्य होतो, नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी. लक्षण आढळ्यास थेट शासकीय रुग्णालयात तपासणी करुन घ्यावी तसेच तपासणीसाठी घरोघरी येणा-या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले.
लक्षणे दिसल्यास तपासणी करा
– कुष्ठरोग अनुवंशिक नाही
– शरीरावर फिक्कट किंवा लालसर डाग / चट्टा तसेच त्या डागावर संवेदना नाही, असा डाग /चट्टा कुष्ठरोग असु शकतो.
– चेतातंतु जाड / दुख-या व त्यांनी पुरवठा केलेल्या भागात संवेदना नाही, अशी लक्षणे असल्यास कुष्ठरोग असु शकतो.
– तेलकट, जाडसर, लालसर व सुजलेली त्वचा, कुष्ठरोग असु शकतो
– मोहीम कालावधीत संदर्भित केलेल्या व्यक्तींनी जवळच्या शासकीय / निमशासकीय दवाखान्यात जावुन तपासणी करावी.










