नागपूर: नागपूर महानगरपालिकेतर्फे शासकीय दंत महाविद्यालयाच्या सहकार्याने शुक्रवारी (ता.२४) गांधीबाग झोन अंतर्गत प्रभाग २२मध्ये महापौर दंत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार गिरीश व्यास, गांधीबाग झोन सभापती श्रद्धा पाठक, नगरसेविका वंदना यंगटवार, मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ.सचिन खत्री, डॉ.सागर नायडु आदी उपस्थित होते.
‘आझादी-७५’ अंतर्गत शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या सहकार्याने नागपूर शहरामध्ये ७५ दंत तपासणी शिबिर घेण्यात येणार आहेत. त्याअंतर्गत प्रभाग २२ मधील जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळाच्या गंगाबाई घाट मार्गावरील लाकडी पूल समाजभवन येथील तेलीपूरा योगासन वर्ग येथे दंत तपासणी व उपचार शिबिर घेण्यात आले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी योगासन वर्गच्या विद्यार्थिनींनी नृत्य सादर करून महापौर व मान्यवरांचे स्वागत केले.
शिबिरामध्ये शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या डॉक्टर्स आणि अन्य वैद्यकीय चमूद्वारे परिसरातील नागरिकांच्या दातांची सफाई, फिलिंग करण्यात आली. तपासणीमध्ये मुख कर्करोगाचा धोका असलेल्यांना आवश्यक मार्गदर्शनही करण्यात आले. याशिवाय एक दिवसापेक्षा जास्त कालावधीच्या उपचाराबाबतही शिबिरामध्ये तपासणी करण्यात आले. पुढील उपचार शासकीय दरात शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयामध्ये करण्यात येत असून यासाठी तेथे शिबिराच्या माध्यमातून येणा-या रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष व वेगळी व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.