Published On : Thu, Jan 10th, 2019

महापौर आपल्या दारी : धंतोली झोनमधील समस्यांचा घेतला आढावा

Advertisement

नागपूर: शहरातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविणे हे नागपूर महानगरपालिकेचे कर्तव्य आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे, त्यांच्या घरातील कचरा रोज संकलीत करणे तसेच नाले सफाई, गडर लाईनची योग्य व्यवस्था असावी यासाठी प्रशासनाने सदैव तत्पर असावे. प्रत्येक प्रभागात नागरिक अनेक समस्यांशी संघर्ष करीत आहेत, या समस्यांना प्राधान्याने घेउन प्रत्येक समस्यांवर योग्य कार्यवाही करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

महापौर आपल्या दारी उपक्रमांतर्गत गुरूवारी (ता. १०) महापौर नंदा जिचकार यांनी धंतोली झोनचा दौरा करून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी धंतोली झोन सभापती विशाखा बांते, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेवक विजय चुटेले, संदीप गवई, नगरसेविका वंदना भगत, लता काटगाये, हर्षला साबळे, भारती बुंडे, विशाखा मोहोड, जयश्री वाडिभस्मे, सहायक आयुक्त विजय हुमने, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे यांच्यासह ओसीडब्ल्यूचे कर्मचारी व संबंधित विभागांचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

महापौर नंदा जिचकार यांनी धंतोली झोनमधील गणेशपेठ समाज भवन, राजाबाक्षा, रामबाग, कुकडे लेआउट, चंद्रमणी नगर, बालाजी नगर, त्रिशरण चौक, अरविंद-उज्ज्वल-विजयानंद सोसायटी आदी ठिकाणी भेट देउन नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.

महापौरांनी दौ-यामध्ये मनपाच्या जाटतरोडी हिंदी प्राथमिक शाळेमध्ये भेट दिली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका उर्मीला पाटील कर्तव्‍यावर नसल्याचे लक्षात आले. कोणतिही पूर्व सुचना न देता ऐन शाळेच्या वेळेत गैरहजर राहणा-या मुख्याध्यापिकेला कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी दिले. शाळेच्या परिसरात असलेल्या पडक्या खोल्यांच्या जागेवर महिला बचत गटांसाठी प्रशिक्षण केंद्र उभारून महिलांना व्यवसायासाठी प्रशिक्षण देता येईल, असे महापौरांनी यावेळी सांगितले. सदर जागेवर महिला बचत गटांच्या प्रशिक्षण केंद्राबाबत प्रस्ताव सादर करण्याचेही त्यांनी यावेळी निर्देशित केले.

यानंतर महापौर नंदा जिचकार यांनी राजाबाक्षा, रामबाग वस्त्यांमध्ये फिरून येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कुकडे लेआउट येथील जनकल्याण सुधार समितीच्या कार्यालयात सुरू असलेल्या महात्मा फुले अभ्यासिकेमध्ये महापौरांनी नागरिकांशी संवाद साधला. परिसरात नियमीत कच-याची गाडी येत नसल्याने रस्त्याच्या कडेला जमा करून ठेवण्यात आलेल्या कच-यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या जागेचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी नागरिकांनी यावेळी केली. संपूर्ण परिसरात नियमीत स्वच्छता करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी दिले. उद्यानाच्या जागेमध्ये सौंदर्यीकरणाबाबत येणा-या अडचणी सोडविण्यासाठी प्रभागातील नागरिकांसह नगरसेवकांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात येणार असल्याचे महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी नागरिकांना सांगितले.

चंद्रमणी नगर परिसरात अनेक ठिकाणी गडर लाईन फुटली आहे. नळाचे पाणीही दुषित असून सफाई कर्मचारी नियमीत येत नसल्याची तक्रार नागरिकांच्या वतीने करण्यात आली. गडर लाईन, नळ लाईन यासंबंधी परिसराची त्वरीत तपासणी करून त्यावर आवश्यक ते कार्य करणे तसेच स्वच्छतेच्याबाबतीत कामचुकारपणा करणा-या सफाई कामगारांची दररोज हजेरी घेण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

बालाजी नगर येथील भाकरे लेआउट परिसरात असलेल्या नाल्यामुळे पावसाळ्यात नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. नाल्याची उंची कमी असल्यामुळे पावसाळ्यात पाणी बाहेर वाहते व थेट नागरिकांच्या घरात शिरते. त्यामुळे नाल्याची उंची वाढवून तिथे सुरक्षा भिंत तयार करणे आवश्यक आहे. यासंबंधी प्रस्ताव तयार असल्याची माहिती संबंधितांकडून यावेळी देण्यात आली. या प्रस्तावावर त्वरीत कार्यवाही करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.

त्रिशरण चौकात रस्त्यावर असलेले विद्युत खांब हटविण्याची मागणी यावेळी नागरिकांच्या वतीने करण्यात आली. नागरिकांची सुरक्षितता आणि सुरळीत वाहतुकीच्या दृष्टीने सदर विद्युत खांब हटविणे आवश्यक आहे. यासंबंधी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या ‘जनसंवाद’ कार्यक्रमात सदर विषय मांडण्याचे आवाहन महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी केले. त्रिशरण चौकातील बॅनर्जी लेआउट येथील विपश्यना केंद्राच्या परिसरात मैदानाचे सौंदर्यीकरण करण्याची मागणी नागरिकांच्या वतीने करण्यात आली.

अरविंद-उज्ज्वल-विजयानंद सोसायटीच्या परिसरात असलेल्या मैदानामध्ये नागपूर महानगरपालिकेतर्फे ग्रीन जिम, बॅडमिंटन कोर्ट, योगासाठी शेड उभारण्यात आले आहे. नागपूर महानगरपालिकेच्या कार्याबद्दल परिसरातील नागरिकांनी महापौर नंदा जिचकार यांच्यासह झोन सभापती विशाखा बांते व सर्व नगरसेविका, नगरसेवकांचे पुष्पगुच्छ देउन आभार मानले. मैदानाच्या परिसरात दररोज स्वच्छता करून मैदानाच्या सुरक्षा भिंतीची रंगरंगोटी करून येथे स्वच्छतेबाबत जनजागृती करणारे संदेश प्रदर्शित करण्याचे महापौर नंदा जिचकार यांनी निर्देशित केले.