Published On : Wed, May 24th, 2023

नागपुरात सिल्लेवाडा कोळसा खाणीत भीषण स्फोट, ११ कामगार जखमी

Advertisement

नागपूर : शहरातील तापमान वाढीमुळे अगोदरच नागरिकांचे हाल होत आहे. तर दुसरीकडे जिल्ह्यात आगीच्या घटनाही दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्‍यातील वायकोली येथील सिल्लेवाडा खाणीत भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. यात ११ कामगार गंभीरीत्या भाजले असून यातील ६ कामगारांची प्रकृती चिंताजनक आहे.

सेक्शन प्रभारी अनिल बोबडे, अनिल बडोले, कुलदीप उडके, महिपाल रामटेके (चरों चणकापूर), मनोज गुप्ता (सिल्लेवाडा), विलास मुळ्ये (खापरखेडा), राजू श्यामराव गजभिये (दहेगाव रंगारी), रामचंद पाल (वलनी), अनिल सिंग (टेकडी कॉलनी), किशोर घेर (सोनेगाव), योगेश सहारे (गोंदेगाव) अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत.

गंभीर जखमी झालेल्या कामगारांना नागपूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. अन्य सहा कामगारांना वळणी येथील वेस्टर्न कूल फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले. सहा कर्मचारी कायमस्वरूपी कर्मचारी असून चार तात्पुरत्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे कामगारांच्या सुरक्षितेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

सिल्‍लावाडा खाणीतील सीम-2 अंतर्गत विभाग-6 मध्ये कोळसा उत्खनन करत असताना हवाई दगडफेकीदरम्यान स्फोट झाल्याने आगीने मोठा पेटला घेतला. या घटनेची माहिती मिळताच वायकोली व्यवस्थापनाने बचावकार्य सुरू केले. हा स्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला. याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे.