नागपूर : देशभरात होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. या सणाच्या दिवशी लोक एकमेकांमधील मतभेद विसरून एकत्र येतात. यंदा होळी सण २४ मार्चला तर धूलिवंदन २५ मार्चला आहे. यापार्श्वभूमीवर नागपुरातील बाजारपेठ होळीच्या साहित्यांनी सजल्या आहेत.बाजारपेठांमध्ये विविध प्रकारचे नैसर्गिक रंग, स्प्रे, मुखवटे ,लहान मुलांसाठी विविध प्रकारच्या पिचकाऱ्या, गाठ्या दाखल झाल्या आहेत. या साहित्यांची खरेदी करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.
लहान मुलांमध्ये कार्टुन्सच्या पिचकाऱ्यांची क्रेज:
यंदा गन, टँक, सिलिंडर, मोटू-पतलू, शूटर, एअर व मशीन गन, पाईप्स तसेच छोटा भीम, डोरेमोन, शिनचेन, अर्जुन आदी कार्टुन आणि सेलेब्रिटींचे चित्र असलेल्या पिचकाऱ्या विकल्या जात आहेत. लहान मुलांकडून पारंपरिक पिचकाऱ्यांऐवजी खेळणी आणि कार्टुन पिचकाऱ्यांना जास्त मागणी आहे. यंदा मोबाईल, बाहुल्या, बंदुकी, प्राणी, पक्षी आदी आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात विक्रीस आहेत.
नैसर्गिक रंगांना पसंती-
सध्या बाजारात होळीनिमित्त रंग, पिचकारी खरेदीला ग्राहकांची लगबग सुरू आहे. ग्राहक नैसर्गिक रंगाला जास्त पसंती देत आहेत. नैसर्गिक सुखे रंग ८० ते १०० रुपये तर ओले रंग १८० रुपयांवर उपलब्ध आहेत.