नागपूर. केंद्रीय मंत्री श्री. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेत सबज्यूनिअर मुले आणि सीनिअर महिला गटामध्ये मराठा लॉन्सर्स महाल संघाने दुहेरी विजेतेपदावर मोहोर उमटविली. विभागीय क्रीडा संकुल मानकापूरच्या इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा पार पडली.
सबज्यूनिअर्स मुलांच्या अंतिम फेरीत मराठा लॉन्सर्स महाल संघाने विद्यार्थी युवक जुना सुभेदार संघाचा ४५-४४ ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. सबज्यूनिअर्स मुलींची अंतिम लढत विक्रांत स्पोर्टिंग नागपूर विरुद्ध रेणूका क्रीडा मंडळ अजनी संघात झाली. या सामन्यात विक्रांत स्पोर्टिंगने ४८-१९ ने दणदणीत विजय मिळविला.
ज्यूनिअर गटात मुलांच्या अंतिम लढतीत मराठा लॉन्सर्स धरमपेठ संघाने मराठा लॉन्सर्स काटोल संघाचा ३२-३० ने पराभव करुन विजेतेपद पटकाविले. मुलींच्या अंतिम सामन्यात विक्रांत स्पोर्टिंग नागपूर संघाचा ३९-१३ ने पराभव करुन साई स्पोर्टिंग काटोल संघाने जेतेपद पटकाविले.
सीनिअर पुरुष गटात अंतिम सामन्यात गोंडवाना क्रीडा मंडळ सडक अर्जुनी संघाने मराठा लॉन्सर्स महाल संघाला ३३-२५ ने मात देऊन विजेतेपदावर मोहोर उमटविली. सीनिअर महिला गटात मराठा लॉन्सर्स महाल संघाने सिटी पोलिस नागपूर संघाचा ४०-३४ ने पराभव करुन स्पर्धेचे अजिंक्यपद आपल्या नावे केले.