File Pic
नागपूर: शहरातील एकूण आतापर्यंत २०३ रेस्टारेंट व बार यांना अग्निशमन विभागाने योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी नोटीस बजावली आहे. यामध्ये जवळजवळ १६ ते १८ रुफटॉप रेेस्टॉरेंट्सचा समावेश आहे. त्यातील काहींवर याआधी कारवाई करण्यात आली होती. परंतु मनपा प्रशासन आणि अग्निशमन विभागातर्फे नोटीस मिळून देखील अजूनही अनेक हॉटेलमालकांनी कोणतीही पावले उचललेली नाहीत. त्यामुळे त्यांचे पाणी कनेक्शन कापण्यात आले आहे.
यासंदर्भात मनपाच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख राजेंद्र उचके यांच्यासोबत नागपूर टुडेने संवाद साधला. त्यांनी सांगितले की, रेेस्टॉरेंट्स आणि बार यांच्यावर रोज कारवाया सुरु आहेत. तसेच विभागीय कार्यालयांना यासंबंधी योग्य त्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार सर्व हॉटेल्स आणि रेस्टारेंटसची यादीप्रमाणे विभागवार तपासणी केली जात आहे.
पश्चिम नागपुरात रुफटॉप रेस्टोरेंट्सची संख्या अधिक आहे. त्यांपैकी झेंडा चौक, गोकुळपेठ, अभ्यंकर नगर, धरमपेठ या भागातील काही हॉटेलमालकांनी नोटीस मिळाल्यावर हॉटेल्स बंद केली. तर इतरांचे पाणी आणि विज कनेक्शन कट करण्यात केल्याची माहिती राजेंद्र उचके यांनी दिली.
यासंदर्भात कारवाई सुरू असून उद्या संध्याकाळी रुफटॉप हॉटेल्सची अंतिम यादी आणि त्यासंदर्भातील कारवाईची संपूर्ण माहिती हाती येईल, असे ते म्हणाले.
—Swapnil Bhogekar