नागपूर : वर्धा शहरात मोक्याच्या ठिकाणी भव्य मंदिर बांधतो त्यासाठी वर्गणी द्या, अशी विनंती करून एका ठगबाजाने विदर्भातील शेकडो लोकांची फसवणूक केल्याची चर्चा वर्धेत रंगली आहे. विशेष म्हणजे या ठगबाजाने वर्गणी घेताना सांगितले वेगळेच आणि केले वेगळेच.
२० हजार वर्गफूट जागेवर मंदिर बांधण्याचे आश्वासन धनाढ्यांना दिले होते. प्रत्यक्षात मात्र केवळ ३ हजार वर्गफुटातच धार्मिक स्थळ बांधले आहे. त्यामुळे वर्गणीदार आता फसवणूक झाल्याचे खासगीत चर्चा करीत आहे. वर्गणीदारांकडून ५ कोटी रुपये जमा करण्यात आले आणि बांधकामावर १ कोटी रुपये खर्च केले.
त्यातील उरलेली रक्कम लोकसभा निवडणुकीत खर्च केल्याचीही चर्चा आहे. विशेष म्हणजे कोणतेही धार्मिक स्थळ बांधण्यासाठी ज्या परवानग्या घ्यावा लागतात त्यातील एकही परवानगी घेण्यात आली नव्हती. वर्गणीदारांना मारोती, बालाजी आदी देवांचे धार्मिक स्थल बांधू असे खोटे आश्वासन दिले होते. मात्र, त्याने वेगळेच धार्मिक स्थळ उभे केले. त्याची माहिती देणगीदारांना दिलीच नाही. ते स्थळ ज्या जागेवर सांगितले होते तेथे न बांधता दूसऱ्या ठिकाणी बांधले. त्यासाठी सहायक धर्मादाय आयुक्त वर्धा यांची परवानगी घेण्यात आली नाही. देणगीदारांना विश्वस्त बनवू असेही आश्वासन देण्यात आले होते, मात्र विश्वस्त नेमणूकही केली नाही. बांधकाम करण्यासाठी नगर रचना विभागाची परवानगी घेतली नाही. तसेच तेथे अनधिकृतपणे वीज पुरवठा चालू आहे.
धार्मिक स्थळ बांधकाम करण्यासाठी पोलीस प्रशासनाचीही परवानगी घ्यावी लागते तशी कुठलिही परवानगी घेण्यात आलेली नाही. वर्गणीदारांकडून सुमारे पाच कोटी रुपये जमा करण्यात आले. त्यात कुणी ११ लाख, कुणी ७ लाख तर कुणी ५ लाख रुपये दिले. तुम्हाला विश्वस्त मंडळात घेतो असे आश्वासन त्यांना देण्यात आले. पण विश्वस्त मंडळ तयार न करताच बांधकाम करण्यात आले. त्यामुळे आता फसवणूक झाल्याचे वर्गणीदारांच्या लक्षात आले. आता काय करावे, कुणाकडे तक्रार करावी, हे वर्गणीदारांना कळेनासे झाले आहे. याप्रकरणी येत्या काही दिवसात तक्रार होण्याची शक्यता आहे.