Published On : Sun, Dec 12th, 2021
By Nagpur Today Nagpur News

घरातील कचऱ्यापासून जैविक खत निर्मिती करणाऱ्यांचा मनपातर्फे सन्मान

Advertisement

स्वनिर्मित खतातून केले किचन गार्डन विकसित : मनपातर्फे घरी जैविक/गांडूळ खत निर्मितीस प्रोत्साहन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतर्फे कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्यावर भर दिला जात आहे. शनिवारी धंतोली झोन अंतर्गत अरविंद सोसायटी, नरेंद्र नगर येथील रहिवासी श्री अजित कुलकर्णी आणि सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी श्री जाधव यांनी ओल्या कचऱ्यापासून जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित केले आहे. धंतोली झोनच्यावतीने त्यांचा सत्कार शनिवारी (ता.११) सुयोगनगर उद्यानात सहायक आयुक्त किरण बगडे यांच्या हस्ते करण्यात आला.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

घरामध्ये ओला कचरा फार काळ साठवून ठेवला तर दुर्गंधी सुटते. काही नागरिक परिसरातील मोकळे प्लॉट अथवा मैदानात कचरा टाकून देतात. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. मात्र, घरात साचलेल्या याच ओल्या कचऱ्यापासून गांडूळखत बनविण्याचा प्रकल्प काही प्रबुद्ध नागरिकांनी सुरू केला आहे. गांडूळखत प्रकल्पासाठी चार बाय दोन फूट बाय फूट या आकाराचे एक भांडे बनविण्यात येते. यामध्ये कचरा टाकण्यासाठी दोन भाग करण्यात येतात. त्यानंतर भांड्यात २५० ते ३०० गांडूळ सोडले जातात.

भांड्यात ओला कचरा टाकल्यानंतर हे गांडूळखत बनवण्याचे काम सुरू करतात. या खताचा वापर आपण स्वतःच्या गार्डनमध्ये सुद्धा करू शकतो. विशेष म्हणजे, यामुळे परिसरात कोणतिही दुर्गंधी पसरत नाही. रोगराई नियंत्रणात आणण्यासाठी हा प्रकल्प उपयुक्त असून नागरिक मोठ्या प्रमाणात खत निर्मिती करून आपल्या घरात भाजीपाल्याची लागवड करीत आहे. स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, खराब झालेल्या फळभाज्या असे फूड वेस्ट मटेरिअल या भांड्यात टाकले जाते. फक्त भांड्यामध्ये दुधाचे पदार्थ, दूध, तेलकट पदार्थ, प्लास्टिक, लोखंड व काचा हे टाकणे टाळावे. गांडूळखत तयार होण्यासाठी साधारणपणे पाच महिने लागतात. खत बनवत असताना काही द्रव्यदेखील तयार होते. या द्रवाचा वापर किटकनाशक म्हणून करू शकतो.


सुयोगनगर उद्यानात धंतोली झोनतर्फे जनजागरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट संस्थेतर्फे नागरिकांना कचऱ्याचे विलगीकरण करण्याची माहिती देण्यात आली. तसेच घरातील ओला कचऱ्याच्या मदतीने जैविक/गांडूळखत निर्मिती करून किचन गार्डन विकसित करण्याची माहिती देण्यात आली. त्यानंतर सहायक आयुक्त बडगे आणि त्यांचा सहकाऱ्यांनी श्री अजित कुलकर्णी आणि श्री जाधव यांच्या घरी जाऊन त्यांच्याकडे विकसीत किचन गार्डनची माहिती प्राप्त करून घेतली. त्यांच्या घरी वांगी, पालक, मेथी, कोबी यासारखा भाजीपाला लावण्यात आला आहे. यावेळी झोनल आरोग्य अधिकारी धर्मेंद्र पाटील आणि अन्य सहकारी उपस्थित होते.

यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी सांगितले की, नागपुरात ५० ते ६० हजार घरांमध्ये घरातून निघणाऱ्या कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे प्रयत्न मनपातर्फे सुरु आहेत. यामधून खत निर्मिती होईल आणि कचऱ्याचे प्रमाण सुद्धा कमी होऊ शकेल. मनपातर्फे नागरिकांना घरी खत निर्मिती करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या प्रकल्पात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेतल्यास त्यांना घरीच जैविक भाजीपाला पिकविता येईल.

नागपुरात अविनाश तेंभुरने, हेमराज वालदे, ऋचा हेमंत चौधरी, विनायक नगर, सुहासिनी गाडे, वसंत नगर, एस एम काटकवार, वसंत नगर, चंचल भिडे, वसंत नगर, विधुला विंचलने, वसंत नगर, रत्ना कंधारी, पांडे लेआऊट, यांनी सुद्धा आपल्या घरी कचऱ्यापासून खत निर्मिती केली आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement