Published On : Fri, May 17th, 2019

मनपातील अधिकाऱ्यांनी घेतले संवेदनशीलतेचे धडे

Advertisement

समानता, विविधता आणि सामाजिक सहभाग विषयावर दोन दिवसीय कार्यशाळा उत्साहात : इक्वीसिटी प्रकल्पाचा उपक्रम

नागपूर: अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्था दिल्लीमार्फत नागपूर महानगरपालिकेमध्ये सुरू असलेल्या इक्वीसिटी प्रकल्पांतर्गत मनपातील वर्ग १ व वर्ग २च्या अधिकाऱ्यांसाठी मंगळवार व बुधवारी (ता.१४ व १५) दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. समानता, विविधता आणि सामाजिक सहभाग या विषयावर आयोजित कार्यशाळेमध्ये मनपातील अधिकाऱ्यांना तज्ज्ञांमार्फत संवेदनशीलतेचे धडे देण्यात आले.

मंगळवारी (ता.१४) अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. तर बुधवारी (ता.१५) अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते दुसऱ्या दिवसाच्या सत्राचे उद्घाटन झाले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, उपायुक्त राजेश मोहिते, सहायक आयुक्त (सामान्य प्रशासन) महेश धामेचा उपस्थित होते.

शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी कटीबद्ध असलेल्या नागपूर महानगरपालिकेच्या अधिका-यांच्या समस्या लक्षात घेउन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेमध्ये दोन्ही दिवस मनपातील सुमारे ९० वर्ग १ व वर्ग २च्या अधिका-यांनी सहभाग घेतला होता. कार्यशाळेमध्ये प्रसिद्ध सामाजिक व आर्थिक सल्लागार डॉ. कपील चंद्रायण,

महिला कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील तज्ज्ञ डॉ. पदमा चांदेकर, प्रकृती महिला व विकास संसाधन केंद्राच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा दामले, वरदान इंडियन असोसिएशनच फॉर प्रमोशन ऑफ ॲडोप्शन अँड चाईल्ड वेलफेअरच्या कार्यकारी संचालिका व बाल संरक्षण आयोग व भारतीय स्त्री शक्तीच्या सदस्या ॲड. वासंती देशपांडे यांनी दोन्ही दिवशीच्या सत्रांमध्ये विविध विषयावर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेत प्रसिद्ध सामाजिक व आर्थिक सल्लागार डॉ. कपील चंद्रायण यांनी समानता आणि विविधता, महिला कायदा आणि आंतरराष्ट्रीय कायद्यातील तज्ज्ञ डॉ. पदमा चांदेकर यांनी लैंगिक समानता तर सामाजिक समावेश या विषयावर प्रकृती महिला व विकास संसाधन केंद्राच्या कार्यकारी संचालिका सुवर्णा दामले यांनी मार्गदर्शन केले. वरदान इंडियन असोसिएशनच फॉर प्रमोशन ऑफ ॲडोप्शन अँड चाईल्ड वेलफेअरच्या कार्यकारी संचालिका व बाल संरक्षण आयोग व भारतीय स्त्री शक्तीच्या सदस्या ॲड. वासंती देशपांडे यांनी लैंगिक समानता या मार्गदर्शन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जयंत पाठक यांनी तर संचालन इक्वीसिटीचे वरिष्ठ संशोधन सहायक शेखर गिरडकर यांनी केले.

कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी यालवी कुलकर्णी, नकुल चतुर्वेदी, रोनित गौतम, अनिरूद्ध मडके यांनी सहकार्य केले.