नागपूर -शहरात अल्पवयीन मुलींना जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करण्याचे प्रकार समोर येत असताना कळमना परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका २० वर्षीय युवकाने तिच्याकडून तब्बल ९८ हजार रुपये रोख आणि २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी कळमना पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पॉक्सो आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणातील आरोपी आयुष वंजारी हा पारडी परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. जून २०२६ मध्ये पीडिता आरोपीच्या संपर्कात आली होती. त्यानंतर आरोपी तिला वारंवार फिरायला जाण्याच्या बहाण्याने घेऊन जात असल्याचे समोर आले. याच काळात त्याने कथितरीत्या पीडितेच्या इच्छेविरुद्ध अश्लील व्हिडिओ तयार केले.
या व्हिडिओंचा आधार घेत आरोपीने ते इंटरनेटवर प्रसारित करण्याची धमकी देत पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. व्हिडिओ व्हायरल होऊन बदनामी होण्याच्या भीतीने पीडितेने आरोपीच्या मागणीनुसार वेगवेगळ्या वेळी ९८ हजार रुपये रोख आणि सुमारे २५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे कानातील दागिने दिल्याचा आरोप आहे.
सुरुवातीला पीडितेने हा प्रकार कुटुंबीयांपासून लपवून ठेवला होता. मात्र, नंतर कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. पीडितेच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी तपास सुरू करत आरोपी आयुष वंजारी याला अटक केली.
आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह पॉक्सो कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कळमना पोलीस करीत आहेत.




