
नागपूर– पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणावर भाष्य करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीका केली. “ममता बॅनर्जी यांचे सध्याचे वर्तन त्यांच्या पराभवाचे स्पष्ट संकेत देत आहे. पश्चिम बंगालची जनता आता बदलाच्या दिशेने वाटचाल करत असून भाजपच्या बाजूने उभी राहत आहे,” असा दावा त्यांनी केला.
बावनकुळे यांनी सांगितले की, पश्चिम बंगाल मधील मतदारांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांच्या विरोधात मतदान होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी नमूद केले.
महिला आरक्षणावरून टीकेची झोड-
महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर निशाणा साधला. “हे विधेयक मंजूर झाले असते तर लोकसभेत ३५० हून अधिक महिला खासदार पोहोचल्या असत्या. महाराष्ट्राच्या विधानसभेतही १५० ते १६० महिला आमदार दिसल्या असत्या. मात्र, इंडिया आघाडीने या ऐतिहासिक संधीची ‘क्रूर हत्या’ केली,” असा आरोप त्यांनी केला.
देशातील सुमारे ७० कोटी महिलांमध्ये यामुळे नाराजी असून भाजप याविरोधात मोर्चे काढणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. “महिलांचे मत घेऊन त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका काँग्रेसने नेहमीच घेतली आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.
भोंदू खरात प्रकरणाची चौकशी सुरू-
भोंदू खरात प्रकरणावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, एसआयटीकडून सर्व बाजूंनी सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहारांचीही तपासणी करण्यात येत आहे. “या प्रकरणावर स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लक्ष ठेवून आहेत. तपास योग्य दिशेने सुरू असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.
महायुतीत मतभेद नाहीत-
महायुतीतील मतभेदांच्या चर्चांवर पडदा टाकत बावनकुळे म्हणाले की, सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत काही तात्पुरते मतभेद झाले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकत्र येत हा तिढा सोडवला आहे. “महायुतीत कोणतेही कायमस्वरूपी मतभेद नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
महिलांचा रोष निवडणुकीत दिसणार
महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या खासदारांविरोधात महिलांचा रोष आगामी निवडणुकांमध्ये दिसून येईल, असा इशारा त्यांनी दिला. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना मोठ्या प्रमाणावर प्रतिनिधित्व मिळावे यासाठी विधेयक आणले. मात्र विरोधकांनी ते रोखले. याचा फटका त्यांना निवडणुकीत बसणार,” असे बावनकुळे म्हणाले.
शेतकऱ्यांसाठी दिलासा; नोंदणी शुल्कात सवलत-
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची घोषणा करताना बावनकुळे यांनी सांगितले की, वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटणीपत्रासाठी आता कोणतेही नोंदणी शुल्क भरावे लागणार नाही. यापूर्वी तहसीलदारांच्या मान्यतेशिवाय वाटणी करता येत नव्हती. मात्र, आता आपसी सहमतीने वाटणी केल्यास केवळ ५०० रुपयांत नोंदणी करता येणार असून अतिरिक्त शुल्काची गरज भासणार नाही. तसेच यासाठी तहसील कार्यालयात जाण्याचीही गरज उरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.








