Published On : Tue, May 8th, 2018

अवैध नळ कनेक्शन तातडीने वैध करा

Lakshmi Nagar Zone
नागपूर: प्रभाग क्र. ३८ मध्ये जयताळा परिसरात असलेले सुमारे ७०० अवैध कनेक्शन तातडीने वैध करा. त्यासाठी परिसरात पुढील पाच दिवसांत विशेष शिबिर लावा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

नागपूर महानगरपालिकेच्या सभागृहात झालेल्या निर्णयानुसार सध्या पाणी समस्येबाबत नगरसेवकांची झोननिहाय बैठक सुरू आहेत. याअंतर्गत मंगळवारी (ता. ८) गायत्रीनगर पाण्याची टाकी येथील कार्यालयात लक्ष्मीनगर झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभागातील नगरसेवकांची बैठक पार पडली. सदर बैठकीत त्या बोलत होत्या. बैठकीला जलप्रदाय समितीचे सभापती पिंटू झलके, उपसभापती श्रद्धा पाठक, लक्ष्मीनगर झोन सभापती प्रकाश भोयर, शिक्षण समितीचे सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समितीचे उपसभापती प्रमोद तभाने, नगरसेवक लखन येरावार, नगरसेविका सोनाली कडू, ॲड. मीनाक्षी तेलगोटे, उज्ज्वला बनकर, प्रणिता शहाणे, लक्ष्मी यादव, वनिता दांडेकर, सहायक आयुक्त महेश मोरोणे, कार्यकारी अभियंता (जलप्रदाय) संजय गायकवाड उपस्थित होते.

सदर बैठकीत प्रभागनिहाय नगरसेवकांनी पाण्याच्या समस्या मांडल्या. काही भागात पाणी पुरवठा कमी होतो. काही नागरिकांच्या तक्रारी आहेत. जयताळा परिसरात अवैध नळ कनेक्शनमुळे अनावश्यक पाणी जाते. असे कनेक्शन कापण्याबाबत चर्चा झाली तेव्हा नगरसेविका उज्ज्वला बनकर यांनी कनेक्शन कापू नका. नागरिक पैसे द्यायला तयार आहेत. ते कनेक्शन वैध करा, अशी सूचना केली. त्यावर महापौरांनी तातडीने त्या परिसरात ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी शिबिर लावून नळ कनेक्शन वैध करा, असे निर्देश दिले.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, इतर झोनच्या तुलनेत लक्ष्मी नगर झोनमध्ये पाण्याची समस्या कमी आहे. मुबलक पाणी आहे. फक्त नियोजनाचा अभाव असल्याने नागरिकांच्या तक्रारी येतात. ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन करावे आणि नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घ्यावी, असे निर्देश दिले. बैठकीला ओसीडब्ल्यूचे अधिकारी राजेश कालरा, अन्य अधिकारी व डेलिगेटस्‌ उपस्थित होते.