Published On : Mon, Sep 21st, 2020

जिल्ह्यातील मृत्यूदर कमी करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ योजना यशस्वी करा

जि.प. अध्यक्षा रश्मी बर्वे यांचे नागरिकांना आवाहन

नागपूर: कोरोनाचे लक्षणे दिसतात तात्काळ उपचार मिळाल्यावर कोरोना आजार दुरुस्त होऊ शकतो. मात्र या आजाराला गृहीत धरून अंगावर आजार काढण्याचा प्रकार वाढीस लागला आहे. त्यामुळे रुग्ण संख्या वाढत आहे. यावर मात करण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ ही मोहीम रामबाण उपाय ठरू शकते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेने अतिशय सक्रियतेने हे सर्वेक्षण करावे व जिल्ह्यातील नागरिकांनी सर्वेक्षण करणाऱ्या पथकाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी केले आहे.

कोवीड-19 यासंदर्भात शासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ हे अभियान अतिशय सक्रियतेने राबविले जात आहे. यासंदर्भात आज माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रश्मी बर्वे यांनी जिल्हा परिषदेच्या डॉ.आबासाहेब खेडकर सभागृहात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी आरोग्य यंत्रणेची सक्रियता आणि तिला मिळणारा प्रतिसाद यामुळे निश्चितच कोरोना आजार व त्यामुळे वाढत असलेला मृत्यूदर कमी होण्यास मदत होणार आहे, असे स्पष्ट केले.


यावेळी मुख्य कार्यपालन अधिकारी योगेश कुंभेजकर, विषय समित्यांचे सभापती श्रीमती नेमावली माटे, श्रीमती उज्वला बोंढारे, श्रीमती भारती पाटील, तापेश्वर वैद्य, जिल्हा आरोग्य अधिकारी दिपक सेलोकर आदी मान्यवर उपस्थित होते.

गेल्या मार्चपासून सुरू झालेल्या या आजाराने आता उग्र स्वरूप धारण केले आहे. नागपूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मृत्यूदर वाढत आहे. यासाठी कोरोना आजार ज्यांना सर्वाधिक घातक ठरू शकतो. श्‍वसनाचे आजार असणाऱ्या नागरिकांनी आपली माहिती शासनाकडे देणे आवश्यक आहे. यापूर्वी देखील निरंतर सर्वेक्षणाला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी, या मोहिमेअंतर्गत ज्यांना रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, हदयरोग, किडनीचे आजार व श्वसनासंदर्भात त्रास आहे, अशा नागरिकांनी त्वरित आपल्या नावाची नोंदणी करणे गरजेचे आहे.

यामुळे नजीकच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये आवश्यक ते उपचार तातडीने मिळू शकतील. तसेच यंत्रणेकडे कोविडपासून सर्वाधिक धोका असणाऱ्या नागरिकांची नोंद देखील असेल. त्यामुळे या नोंदी करताना नागरिकांनी सहकार्य करण्याचे, त्यांनी आवाहन केले. सोबतच आरोग्य यंत्रणेने देखील तपासणी मोहीम राबवताना नागरिकांना मास्क वापरणे, सॅनीटायझर किंवा साबणाचा वापर करून हात स्वच्छ ठेवणे, तसेच शारीरिक अंतर राखण्याचे लोकशिक्षण देण्याचे देखील आवाहन केले.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी बोलतांना निरंतर सर्वेक्षण यापूर्वीच तीन महिन्यांपासून सुरू होते. त्यामुळे या नव्या मोहिमेत आता ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ॲप्स देखील उपयोग होणार आहे. यामुळे सुलभ पद्धतीने माहिती गोळा केली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत नागरिकांना तीन पद्धतीची माहिती दिली जाणार आहे. या संदर्भातील प्रसिद्धी अभियान देखील राबविले जाणार आहे. यामध्ये कोरोना आजाराची लक्षणे नाहीत. अशा नागरिकांनी कोरोना काळात काय काळजी घ्यावी, कोरोना आजाराची लागण झाली असून अलगीकरणात असणाऱ्या बाधित यांनी काय काळजी घ्यावी, यापूर्वीच कोरोनाची लागण होऊन गेलेल्या नागरिकांनी देखील आता पुढे कोणती काळजी घ्यावी याबाबतची माहिती दिली जाणार आहे. त्यामुळे कोरोना आजाराला गृहीत न धरता प्रत्येक घरात या आजाराची माहिती लहानापासून मोठ्यापर्यंत व्हावी. हा देखील या मोहिमेचा उद्देश आहे. कोरोना सोबत जगताना पुढच्या काळात कोरोना होणार नाही यासाठी प्राथमिक कोणत्या गोष्टी करणे गरजेचे आहे हे प्रत्येक नागरिकाला माहिती व्हावे व त्या माध्यमातून पॉझिटिव्ह रूग्ण कमी व्हावेत. मृत्यूदर कमी व्हावा हा या मोहिमेचा उद्देश असून नागरिकांनी या मोहिमेला प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डी.एस. सेलोकार यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी, या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यांमध्ये निर्माण करण्यात आलेल्या पथकांची माहिती दिली. जिल्ह्यामध्ये 1994 पथके तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 21 लक्ष 98 हजार 941 लोकसंख्या लक्षात घेता ही पथके तयार करण्यात आली असून 4 लक्ष 91 हजार 531 घरांची भेट या काळात ही पथके घेणार आहे. जिल्ह्यातील 13 तालुक्यांमध्ये तसेच नागपूर शहर व ग्रामीण भागामध्ये ही मोहीम राबविली जाणार आहे.

गेल्या 15 सप्टेंबरपासून या मोहिमेला नागपूर जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली असून ऑक्‍टोबरपर्यंत ही मोहीम राबविली जाणार आहे. प्रत्येक नागरिकाला कोरोना संदर्भात योग्य माहिती देण्याची ही मोहीम आहे. आजच्या पत्रकार परिषदेमध्ये जनजागरणासाठी आवश्यक असणाऱ्या पत्रकाचे प्रकाशन, प्रसिध्दी साहित्याचे वितरणही करण्यात आले.