मुंबई/ नागपूर: महाराष्ट्रातील महानिर्मितीचे वीज निर्मिती केंद्र पूर्ण क्षमतेने चालवण्यासाठी आवश्यक आणि उत्कृष्ट प्रतीचा कोळसा पुरवठा वेकोलिने करावा. तसेच रेल्वे विभागाने कोळसा वाहतूक करण्यासठी पूरेशा रॅक महानिर्मितीला उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश केंद्रीय कोळसा व रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी दोन्ही विभागाच्या प्रशासनाला आज दिले.
दिल्ली येथे राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल व दोन्ही विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्या बैठकीत वरीष्ठ वरील निर्देश देण्यात आले. आगामी काळात महानिर्मितीच्या सातही वीज निर्मिती केंद्रांना वीज निर्मितीसाठी लागणारा कोळसा कमी पडणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात यावी.
कोळश्यामुळे कोणत्याही केंद्राची वीज निर्मिती कमी होणार नाही याकडे आवर्जून लक्ष द्यावे. एमसीएल व एसईसीएल यांनीही पुरेसा कोळसा महानिर्मितीला पुरवावा. एवढेच नव्हे तर एमसीएल व एसईसीएल या कंपन्यांनी अधिकचा कोळसा कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती केंद्राला कसा पुरवठा करता येईल, याचीही तरतूद करावी, असे निर्देशही पियुष गोयल यंनी या बैठकीत दिले.
कळमना आणि गोधनी येथून कोळसा पूरवठा करण्यासाठी दोन रेल्वे ट्रॅक निर्मितीचे बांधकामही लवकर करण्याचे निर्देश रेल्वेला देण्यात आले. तसेच भुसावळ वीज निर्मिती केंद्रासाठी दरवर्षी लागणाऱ्या कोळश्याची तरतूदही वेकोलीने करावी. वीज निर्मिती केंद्रांना कोळसा पुरवण्यासाठी रेल्वे तर्फे उपलब्ध होणाऱ्या रॅक्समध्ये आवश्यक ती वाढ करण्यात यावी असे निर्देश रेल्वे विभागाला पियुष गोयल यांनी दिले.
दिल्ली येथील बैठकीत ऊर्जा मंत्री बावनकुळे यांच्या सोबत महानिर्मितीचे व्यवस्थापकीय संचालक बिपीन श्रीमाळी, सुत्रधारी कंपनीचे संचालक विश्वास पाठक, केंद्रीय कोळसा मंत्रालयाचे सचिव डॉ. इंद्रजित सिंग, महानिर्मितीचे संचालक श्याम वर्धने व अन्य वरिष्ठ अधिकारी उपलब्ध होते.
