नागपूर : नागपूरच्या नंदनवन परिसरात एका गेमिंग कॅफेत मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नेहरू नगर भागातील या दुकानातून अज्ञात चोरट्याने तब्बल ३ लाखांचा इलेक्ट्रॉनिक साहित्य चोरून नेल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, ही संपूर्ण घटना दुकानात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्याआधारे पोलिस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, साकोली येथील रहिवासी ऋषी चंद्रशेखर गुप्ता यांचा नेहरू नगर येथे गेमिंग कॅफे नावाने व्यवसाय आहे. शनिवारी रात्री गुप्ता यांनी दुकान बंद करून घरी प्रस्थान केले. मात्र मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप तोडून दुकानात प्रवेश केला आणि आत ठेवलेले प्ले स्टेशनचे कंट्रोलर, सीपीयू, प्रोसेसर, रॅम, हार्ड डिस्क, ग्राफिक कार्ड यांसह इतर मौल्यवान इलेक्ट्रॉनिक साहित्य लंपास केले. चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत सुमारे ३ लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
या प्रकरणी गुप्ता यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा नोंदवला आहे. सीसीटीव्हीत आरोपीचे फुटेज मिळाल्याने त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी शहरभरात मोहीम सुरू केली आहे.