
नागपूर : सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील शुल्कात मोठी कपात केली आहे. कच्च्या सोयाबीन आणि पाम तेलावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आले आहे.
याशिवाय कच्च्या सूर्यफूल तेलावरील आयात शुल्क थेट शून्यावर आणण्यात आले आहे. सोयाबीन आणि शुद्ध पाम तेलावरील शुल्क ३२.५ टक्क्यांवरून २७.५ टक्के, तर शुद्ध सूर्यफूल तेलावरील शुल्क ३२.५ टक्क्यांवरून २२.५ टक्के करण्यात आले आहे.
आयात शुल्क कमी झाल्याने आयातदारांचा खर्च कमी होण्याची शक्यता असून, त्याचा परिणाम देशांतर्गत खाद्यतेलाच्या किमतींवर होऊ शकतो. त्यामुळे आगामी सणासुदीत ग्राहकांना खाद्यतेलाच्या वाढत्या दरांपासून काहीसा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.
मात्र, किरकोळ बाजारात तेल किती स्वस्त होईल, हे जागतिक बाजारातील दर, आयात खर्च, रुपयाचा विनिमय दर आणि देशांतर्गत मागणी-पुरवठ्यावर अवलंबून राहणार आहे.




