
अहमदाबाद – अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या बोईंग 737-8 ड्रीमलाइनर विमानाच्या भीषण अपघातानंतर देशभरात शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत २६५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, विमान अपघाताची कारणमीमांसा शोधण्यासाठी चौकशी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. त्याच दरम्यान, अपघातस्थळावरून सर्वात महत्त्वाचा पुरावा म्हणजे ब्लॅक बॉक्स शोधण्यात यश मिळालं आहे.
Featured Products
‘ब्लॅक बॉक्स’ म्हणजे काय?
जरी नाव ‘ब्लॅक बॉक्स’ असले तरी, प्रत्यक्षात हे उपकरण केशरी रंगाचे असते जे अति तापमान, दाब, आग, पाणी आणि भीषण धक्क्यांनाही सहन करू शकते. विमानाच्या शेवटच्या भागात हे ठेवलेले असते कारण तो भाग तुलनेने सुरक्षित राहतो.
ब्लॅक बॉक्स दोन मुख्य भागांत विभागलेला असतो:
डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) – हा विमानाचा वेग, उंची, इंजिनचा थ्रस्ट, इंधनाचा वापर, हवामान आणि उड्डाण मार्ग यांसारखा तांत्रिक डेटा २४ तासांहून अधिक वेळ रेकॉर्ड करतो.
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) – हा पायलट आणि को-पायलट यांच्यातील संभाषण, तसेच एअर ट्रॅफिक कंट्रोलशी झालेल्या संवादांची नोंद ठेवतो.
या दोन्ही रेकॉर्डिंगमुळे अपघाताच्या आधीच्या आणि शेवटच्या क्षणांतील परिस्थिती स्पष्ट होते, ज्यामुळे दुर्घटनेचे खरे कारण शोधणे शक्य होते.
पाण्यातही सोपा शोध –
जर विमान समुद्रात कोसळले, तर ब्लॅक बॉक्समधील ‘अंडरवॉटर लोकेटर बीकन’ ३० दिवसांपर्यंत सिग्नल पाठवत राहतं, ज्यामुळे शोध कार्य अधिक सोपं होतं. या यंत्रणेमुळे खोल समुद्रातसुद्धा ब्लॅक बॉक्स सापडण्याची शक्यता वाढते.
चौकशीला वेग मिळण्याची शक्यता-
अहमदाबाद अपघातातील ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर आता संबंधित विमान कंपनी, नागरी उड्डाण संचालनालय (DGCA) आणि इतर तज्ज्ञ मंडळी अपघाताच्या मुळावर जाण्यास सज्ज झाले आहेत. सॉलिड स्टेट मेमरीचा वापर केल्यामुळे रेकॉर्डिंग सुरक्षित राहिल्याची शक्यता आहे.








