
नागपूर -शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने २९ आणि ३० सप्टेंबर रोजी विविध गुन्ह्यांविरोधात कारवाई करत ११ प्रकरणांत १८ आरोपी आणि विधिसंघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी एकूण ३९ लाख ९ हजार ६४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी केलेल्या कारवाईत पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. आरोपींकडून चोरीचे सोने-चांदीचे दागिने तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे संबंधित गुन्ह्यांच्या तपासाला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
हत्येतील दोन वॉन्टेड आरोपी ताब्यात-
गुन्हे शाखेने हत्येच्या प्रकरणात फरार असलेल्या दोन वॉन्टेड आरोपींनाही ताब्यात घेतले. दोघांचाही पोलीस शोध घेत होते. ताब्यात घेतल्यानंतर त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले.
‘फॉरेन ग्रूम’च्या नावाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश-
गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक-३ आणि सायबर टीमने परदेशी वर असल्याचे भासवून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश केला. या प्रकरणात गुजरातमधील सात आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपींकडून चारचाकी वाहन, दुचाकी, मोबाईल फोन आणि रोख रकमेसह सुमारे १८ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. परदेशी वराच्या नावाने लोकांना जाळ्यात ओढून आर्थिक फसवणूक केल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे.
याशिवाय महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गतही स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या. ताब्यात घेतलेल्या आरोपींची चौकशी सुरू असून, त्यांचा इतर गुन्ह्यांतील सहभाग आहे का, याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे.



