नागपूर : महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पाचपावली येथील एमडी बनविणाऱ्या फॅक्ट्रीचा भंडाफोड केला आहे. डीआरआयच्या ३५ सदस्यीय पथकाने ही कारवाई केली ज्यात मुंबई, पुणे आणि नागपूर येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश होता. कारवाई गुप्त ठेवण्यात आली होती. स्थानिक पाचपावली पोलिसांनाही याची कल्पना नव्हती.
नागपुरातील पहिलीच अंमली पदार्थ लॅब-
माहितीनुसार, मुंबई आणि पुण्यातील ड्रग्ज कार्टेल आणि अवैध धंद्याचा पर्दाफाश केल्यानंतर हा छापा टाकण्यात आला. यामध्ये आकाश हारोडे, साहिल शेख, सुमित घोनमोडे आणि दिव्यांशु चक्रपाणी या 4 आरोपींना एनडीपीएस कायदा 1985 च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. विभागाने शहरातील अशा पहिल्याच अंमली पदार्थ लॅबचा पर्दाफाश केला आहे.
मेफेड्रोन फॅक्ट्रीची नियोजनपूर्ण उभारणी –
डीआरआय अधिकाऱ्यांनी काही पेडलर्स आणि पुरवठादारांची चौकशी केली तसेच त्यांच्या फोन कॉल डेटा रेकॉर्डचे विश्लेषण केले. मेफेड्रोनच्या उत्पादनासाठी लागणारी सर्व रसायने, साहित्य आणि यंत्रसामग्रीने सुसज्ज कारखाना उभारण्यात आल्याचे शोधकार्यात उघड झाले. सूत्रधाराने प्रथम संपूर्ण यंत्रसामग्री खरेदी करून स्थापित केली आणि कच्चा मालही मिळवला ज्यातून 100 किलोग्रॅमपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले जाऊ शकते असे म्हटले जाते.
आरोपींनी आधीच द्रव स्वरूपात 50 किलोपेक्षा जास्त मेफेड्रोन तयार केले होते आणि ते उत्पादन क्रिस्टलाइज्ड/पावडर स्वरूपात आणण्यासाठी पुढील प्रक्रिया सुरू होती. द्रव स्वरूपात जप्त केलेल्या 51.95 किलो मेफेड्रोनची किंमत सुमारे 78 कोटी रुपये आहे. यासोबतच कच्चा माल आणि उपकरणेही जप्त करण्यात आली आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींना पुढील चौकशीसाठी डीआरआय कोठडीत पाठवण्यात आले आहे. मोठ्या कारवाईमुळे डीआरआयच्या पथकाने कारवाईदरम्यान शहर पोलिसांचीही मदत घेतली. तसेच याप्रकरणी पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.