Published On : Sat, Dec 2nd, 2017

मजिप्रा पेरिअर्बन पाणीपुरवठा योजना दहा गावातील योजना पूर्ण, सोलरवर आणणार : पालकमंत्री

priurban meeting

नागपूर: शहरालगत असलेल्या 10 गावांमध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाअंतर्गत घेण्यात आलेल्या पेरिअर्बन पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण झाली असून गावांतील नागरिकांच्या मागणीनुसार त्यांच्या घरापर्यंत पाणी पोहाचवण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे. तुरळक कामे व्हायची आहेत. ती अधिवेशनापर्यंत पूर्ण करावी. अधिवेशन काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या योजनांचे उद्घाटन होणार असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.

मजिप्राच्या पाणीपुरवठा योजनांबाबत आढावा बैठकीत पालकमंत्र्यांनी ही माहिती सांगितली. 10 गावांमध्ये 18818 कुटुंबे असून पाणीपुरवठा मीटरसाठी 5657 अर्जाचे वाटप करण्यात आले आहे. 1706 कुटुंबांना नळाचे कनेक्शन देण्यात आले. बेसा बेलतरोडी पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी पोहोचले आहे. शंकरपूर गावात पाणी पोहाचले आहे. घरोघरी मीटर लावण्याची कामे मजिप्रातर्फे करण्यात येत आहेत. बेसाबेलतरोडी 4.46 लाख लिटरच्या 2 पाण्याच्या टाक्या तयार आहेत. बेसा येथे 4 पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या असून प्रत्येक टाकी 2.37 लक्ष लिटरची आहे. घोगली येथे 50 हजार लिटरची एक टाकी बांधण्यात आली आहे. पिपळा येथे 1.65 लाख लिटरच्या 2 टाक्या पूर्ण झाल्या आहेत. हुडकेश्वर येथे 55 हजार लिटरची टाकी, गोन्ही सिम येथे 3 टाक्या, बहादुरा येथे 2 टाक्या, खरबी येथे 4 टाक्या बांधण्यात आल्या आहेत. कापसी खुर्द येथे प्रत्येकी 2.30 लाख लिटरच्या 2 टाक्या पूर्ण झाल्या आहेत.

या दहा गावांसाठी करण्यात आलेल्या पाणीपुरवठा योजनांसाठी 23274 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहे. 15 दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण जलसंपदा विभागाने निम्न वेणाच्या वडगाव प्रक़ल्पातून मजिप्राला दिले आहे. याशिवाय 103 किलोमीटरची अतिरिक्त पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे. बहुतांश कुटुंबांना अजून पाणीपुरवठ्याच्या मीटरसाठी अर्ज भरून दिले नसल्यामुळे सध्या फक्त 5 एमएलडी वापरले जात आहे. उर्वरित पाणी शिल्लक राहणार आहे. येत्या 2 महिन्यात पाण्याचा वापर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जास्तीत जास्त नागरिकांना नळ कनेक्शन देण्याचे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी दिले आहे.


या योजनेच्या मूळ आराखड्यापेक्षा अधिक पाण्याची मागणी होत असल्यामुळे 19 कोटी रुपयांची मागणी नासुप्रकडे करण्याची सूचना पालकमंत्र्यांनी केली. पेरिअर्बनच्या सर्व पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर आणण्याच्या सूचनाही पालकमंत्र्यांनी केली. बीडगाव तरोडी अतिरिक्त पाईपलाईनसाठी नासुप्रने निधी देण्याचही पालकमंत्री म्हणाले.