Published On : Mon, Jul 18th, 2022
By Nagpur Today Nagpur News

स्वच्छता पाळा, डेंग्यूपासून संरक्षण करा

Advertisement

लक्षणे आढळल्यास त्वरीत वैद्यकीय औषधोपचार घ्या

नागपूर : अतिवृष्टिमुळे डेंग्यू व इतर किटकजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असते. त्याच्या नियंत्रणाकरिता मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार मनपा प्रशासनाने आधीपासूनच उपाययोजना सुरू केलेल्या आहेत. जनजागृती, घरोघरी सर्वेक्षण, औषध फवारणी, धूर फवारणी, कुलरमध्ये औषधी टाकणे, गप्पीमासे सोडणे या सर्व उपाययोजना नियमितपणे मनपातर्फे करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही काही भागात डेंग्यूच्या रुग्णांची नोंद होते आहे किंवा लारवा आढळतो आहे. अशा स्थितीत प्रत्येक नागरिकाने परिसरात व घरी स्वच्छता पाळणे आवश्यक आहे तसेच डेंग्यू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधून औषधोपचार करून घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मनपाच्या हिवताप व हत्तीरोग विभागामार्फत करण्यात आले आहे.

डेंग्यू हा आजार डेंगी विषाणूमुळे होतो व त्याचा प्रसार एडिस इजिप्टाय नामक मादी डासाच्या चावल्यामुळे होतो. साठविलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात भंगार साहित्य जसे – टायर, नारळाच्या करवंट्या, रिकामे डबे, पाण्याचे टाके, फ्रिज मागील पाण्याचे ट्रे, कुंडया, कुलर, ड्रेनेजच्या जाळया, ई. ठिकाणी या डासाची उत्पत्ती होते. त्यामुळे नागरिकांनी निरोपयोगी सामानाची विल्हेवाट लावावी. पाणी वाहते करावे, आठवडयातून कोणताही एक कोरडा दिवस पाळावा. लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे सैल कपडे घालावेत. शहरी भागात कुलरमध्ये जमा असलेल्या पाण्यात ह्याची उत्पत्ती जास्त असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले आहे. सध्याच्या वातावरणामध्ये कुलरची आवश्यकता नसल्यामुळे सर्वांनी कुलर बंद करून ठेवावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.

डेंग्यू या आजारामध्ये ताप येणे, उलट्या होणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी, सांधेदुखी ई. लक्षणे असतात. ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून वेळीच लक्षणाकरिता औषधोपचार घ्यावा. डेंग्यु आजारावर कोणतीही लस किंवा निश्चित औषधोपचार उपलब्ध नाही. त्यामुळे त्याच्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अत्यंत महत्वाचे आहे, याकरिता सतर्कता बाळगण्यासाठी मा. आयुक्त, मनपा यांनी जनतेस आवाहन केले आहे.

Advertisement

विशेष म्हणजे, डेंग्यूचा डास हा दिवसाच चावतो व १५ ते २० इंचापर्यंत डंख घेण्याची क्षमता असते. त्यामुळे घराबरोबर आपल्या कामाच्या ठिकाणीही वरिल सर्व बाबींकडे नागरिकांनी लक्ष द्यावे व डेंग्यूपासून आपले संरक्षण करावे. तसेच सर्व शासकीय आणि अशासकीय संस्थांनी देखील याची दखल घेऊन आपल्या अधिनस्त कार्यालयात वरिल सर्व बाबींचे पालन करावे. सर्व शासकीय आणि खाजगी रूग्णालयामध्ये डेंग्यूचा रूग्ण आढळल्यास त्वरित मनपास माहिती दयावी.

मागील वर्षी जानेवारी ते डिसेंबर २०२१ दरम्यान, नागपूर महानगरपालिका क्षेत्रामध्ये ८०३० तापाचे रक्तजल नमूने तपासण्यात आले. त्यापैकी १०५४ दुषित आढळलेले व ०६ मृत्यू झाले. यावर्षी जानेवारी २०२२ पासून ते जून २०२२ पर्यंत संशयीत डेंग्यू तापाचे १७ रक्तजल नमूने तपासण्यात आले. त्यात ०८ दुषित डेंग्यू रूग्ण आहेत व कुठलाही मृत्यू झालेला नाही.

ही काळजी घ्या

Ø घराच्या सभोवताल अथवा छतावर भंगार साहित्य – टायर, नारळाच्या करवंटया, रिकामे डबे, पाण्याचे टाके, कुडया, कुलर ई. ठिकाणी डासांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घेणे.

Ø आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा.

Ø लहान मुलांना संपूर्ण अंग झाकेल असे कपडे घालावे.

Ø घरी असलेले सर्व कुलर बंद करून पाण्याची टाकी स्वच्छ पुसून कोरडी करावी.

Ø सभोवतालच्या परिसरातील साचलेले पाणी वाहते करावे

Ø पाण्याची भांडी, टाकी, ओव्हरहेड टॅक, यावर कवर झाकावे.

Ø डेंग्यू सदृश्य ताप आढळल्यास त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधुन वेळीच औषधोपचार करावा.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Follow Nagpur Today on Google
Add Nagpur Today to your Preferred Sources on Google to see our latest news more prominently in Search.