नागपूर – स्वातंत्र्याच्या 79 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ‘महावितरण’ने नागपूर जिल्ह्यात ‘सौर ग्राम दिन’ या विशेष उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमाचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील वीज ग्राहकांना सौर ऊर्जेचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना केंद्र व राज्य सरकारच्या विविध सौर ऊर्जा योजनांचा लाभ घेण्यास प्रोत्साहित करणे हा होता. या अभियानामुळे शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातही सौर ऊर्जेची क्रांती घडवून आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
या अभियानाची सुरुवात नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते झाली. त्यांनी परिमंडल कार्यालयातून ‘सौर ऊर्जा रथाला’ हिरवा झेंडा दाखवून या उपक्रमाचा शुभारंभ केला. या रथाने विविध भागांमध्ये ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना’,‘मागेल त्याला सौर कृषी पंप‘, ‘प्रधानमंत्री कुसुम योजना’ आणि ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.०’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची सविस्तर माहिती दिली.
या अभियानात महावितरणचे वरिष्ठ अधिकारी आणि अभियंते थेट ग्रामसभांमध्ये सहभागी झाले. त्यांनी गावातील लोकांना सौर ऊर्जेचे फायदे समजावून सांगितले आणि वीज बिलावरील खर्च कसा कमी करता येईल, याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, या योजनांमध्ये सहभागी होण्यासाठी लागणारे अर्ज आणि आवश्यक कागदपत्रेही त्यांनी ग्रामसभांच्या ठिकाणीच स्वीकारली.
शहरी भागात ‘प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला’ आधीच मोठा प्रतिसाद मिळत आहे. आता महावितरण ग्रामीण भागातील नागरिकांनाही या योजनेत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. या योजनेअंतर्गत, घराच्या छतावर सौर पॅनेल बसवून वीज निर्मिती करता येते, ज्यामुळे वीज बिल जवळजवळ शून्य होते. याचबरोबर, ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ ही योजना शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे. या योजनेमुळे शेतीला दिवसाही वीज उपलब्ध होते, ज्यामुळे शेती सिंचनासाठी मोठा फायदा होतो आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याची माहिती यावेळी नागरिकांना देण्यात आली.
या जनजागृती मोहिमेला ग्रामीण भागातून, विशेषतः ग्रामपंचायतींच्या ग्रामसभा, शाळा, महाविद्यालये, बस स्थानके, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि आठवडी बाजारातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रॅली आणि प्रभातफेऱ्या काढूनही या योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यात आली. या उपक्रमात सरपंच, उपसरपंच आणि ग्राम विकास अधिकाऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. अनेक ग्रामस्थांनीही या योजनांमध्ये सहभागी होण्याची तयारी दर्शवली,
नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी सांगितले की, प्रत्येक शाखा कार्यालयांतर्गत किमान एक गाव पूर्णपणे सौर ऊर्जेवर आणण्याचे महावितरणचे उद्दिष्ट आहे. त्यांनी नागरिकांना ‘वीज ग्राहक’ न राहता ‘वीज उत्पादक’ बनण्याचे आवाहन केले, जेणेकरून मा. पंतप्रधानांच्या ‘हरित ऊर्जेच्या’ स्वप्नाला बळ मिळेल.