
नागपूर – महाराष्ट्रातील वीजग्राहकांसाठी दिलासादायक निर्णय समोर आला आहे. महावितरणच्या २०२५-२६ ते २०२९-३० या कालावधीतील बहुवार्षिक वीजदर याचिकेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने मंजुरी दिली असून, पुढील पाच वर्षांत वीजदर टप्प्याटप्प्याने कमी करण्याचा प्रस्ताव स्वीकारण्यात आला आहे. यामुळे घरगुती, औद्योगिक आणि वाणिज्यिक अशा सर्व प्रवर्गातील ग्राहकांना २०३० पर्यंत स्वस्त वीज मिळणार आहे.
महावितरणने स्पष्ट केले आहे की या कालावधीत कोणत्याही प्रवर्गासाठी वीजदर वाढवले जाणार नाहीत, उलट दरवर्षी कपात करण्यात येणार आहे. विशेषतः १०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांसाठी सरासरी दर ७ रुपये ३१ पैशांवरून कमी होऊन ७ रुपये १० पैसे होणार असून, पाच वर्षांत या गटासाठी सुमारे २६ टक्क्यांची कपात होईल. १०० ते ३०० युनिट वापर करणाऱ्या ग्राहकांनाही दरात घट अनुभवायला मिळणार आहे, तर औद्योगिक ग्राहकांसाठीही दरात किरकोळ पण महत्त्वाची घट करण्यात आली आहे.
उद्योग आणि व्यावसायिक वीजग्राहकांसाठी ‘टाइम ऑफ डे’ (TOD) सवलत कायम ठेवण्यात आली असून, सकाळी ९ ते दुपारी ५ या वेळेत वीज वापरल्यास एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान १५ टक्के आणि ऑक्टोबर ते मार्च दरम्यान २५ टक्के सवलत मिळणार आहे. त्यामुळे उत्पादन क्षेत्राला मोठा फायदा होणार असून, उद्योगांसाठी हा निर्णय ‘अच्छे दिन’ ठरण्याची शक्यता आहे.
महावितरणच्या या निर्णयामुळे शहरांसह ग्रामीण भागातील ग्राहकांनाही दिलासा मिळणार आहे. सौरऊर्जेचा वाढता वापर आणि ऊर्जा व्यवस्थापनातील बदल यामुळे वीजदर कमी करण्यास मदत झाल्याचे सांगण्यात येत आहे. पुढील पाच वर्षांत वीजदरात होणारी ही कपात राज्यातील लाखो ग्राहकांसाठी आर्थिक दिलासा ठरणार आहे.








