Published On : Tue, Oct 10th, 2017

महाराष्ट्राचा आवाज सातासमुद्रापार वैशाली भैसने-माडे यांचा अमेरिकेत

Advertisement

मुंबई : मराठी आणि हिंदी या दोन्ही संगीतसृष्टीत भरीव योगदान देणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांनी आपल्या यशाची छाप सातासमुद्रापार नेत, महाराष्ट्राच्या शिरपेचात मनाचा तुरा खोवला आहे. त्यांच्या संगीत क्षेत्रातील भरीव योगदानाबाबत अमेरिकेत अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा “सुरमणी रत्न’ पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, रोख दोन लाख रुपये, असे या पुरस्काराचे स्वरूप होते. एवढ्या कमी वयात संगीतसृष्टीला योगदान देणारी गायिका या देशात कुणी नाही, असे मत पुरस्कार वितरणसमयी मान्यवरांनी व्यक्त केले. अमेरिकेमधील न्यूयॉर्क शहरात आज मान्यवरांच्या हस्ते सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांना “सुरमणी रत्न पुरस्कार 2017′ ने सन्मानित करण्यात आले.

अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात महाराष्ट्रीय आणि गुजराथी बांधव एकत्रित येऊन सांस्कृतिक सोसायटीच्या माध्यमातून भारतातील उत्कृष्ट पार्श्वगायिकेला तिच्या कर्तृत्वासाठी पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या वर्षी “सारेगमप’ या सिंगिंग टॅलेंट शोमधून कर्तृत्वाची छाप टाकून संपूर्ण देशाला आपल्या गाण्याने मोहिनी घालणाऱ्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांना हा पुरस्कार जाहीर झाला होता. आज या पुरस्काराचे दिमाखदार सोहळ्यात वितरण झाले. सुहाग मेहता, राकेशकुमार जोशी, राज राही, निश्‍चय ललका, कुलबीरसिंग, जयबीर जयसिंग, डॉ. कमल जफर, एच. के. शहा अशा अनेक दिग्गजांची या सोहळ्याला उपस्थिती होती. त्यांच्या हस्ते वैशाली यांना पुरस्कार देण्यात आला. या वेळी उपस्थित सर्व मान्यवरांची भाषणेही झाली.

पुरस्काराला उत्तर देताना वैशाली भैसने-माडे म्हणाल्या की, मला महाराष्ट्रात लोकसंगीताची चळवळ वाढवायची आहे. ज्यांना गाणं शिकायचं आहे; पण ते शिकू शकत नाहीत, अशांसाठी मी आता “वैशाली माडे फाऊंडेशन’ या नावाने काम सुरू केले आहे. गायकी शिकणाऱ्यांसाठी हे मोठे व्यासपीठ असणार आहे. आपल्या देशात उपेक्षित घटकांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. सैनिकांच्या विधवा पत्नी, अनाथाश्रम, वृद्धाश्रम, चांगल्या शाळा उभारणे या सर्व आपल्या समाजाच्या मुख्य अंग असलेल्या घटकाला निधी उभा करून देणे या समाजोपयोगी घटकांसाठी त्यांच्यासोबत मला काम करायचे आहे. बाबासाहेबांच्या विचारांची चळवळ मला देशभर न्यायची आहे. “भीमाची लेक मी’च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात ही चळवळ गेली आहे. या माध्यमातून चार हजार’ शो’ मी आतापर्यंत केले आहेत. काही शो परदेशातही केले आहेत. आता पुढचे शो देशातल्या इतर राज्यात करायचे आहेत. त्याची सुरुवात मी केली असल्याचे वैशाली यांनी या वेळी सांगितले. या वेळी अनेक मान्यवरांची भाषणे झाली.

वैशाली भैसने-माडे यांच्या यशाचा चढता आलेख…

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली भैसने-माडे यांनी मराठी आणि हिंदी सारेगमपचा महासंग्रामही जिंकल्यावर सुरेल आवाज आणि लयबद्धतेच्या जोरावर वैशाली यांनी यशाची अनेक शिखरे काबीज केली. “बाजीराव मस्तानी’ या चित्रपटातील… “पिंगा ग पोरी पिंगा’, “हंटर’मधील “ये ना गडे’ अशी अनेक गाणे वैशाली यांच्या नावावर आहेत. मराठी असो वा हिंदी, पार्श्वगायनात तिने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. “होणार सून मी या घरची’, “माझ्या नवऱ्याची बायको’ अशा 22 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी मालिकांचे टायटल सॉंग वैशाली यांनी गायले. सध्या वैशाली या मराठी व हिंदी सिनेमांसाठी पार्श्वगायन करतात. चारशेपेक्षा जास्त मराठी-हिंदी चित्रपटांत वैशाली यांनी गाणी गायली आहेत.

गायनात महाराष्ट्राने अनेक मौल्यवान हिरे चित्रपटसृष्टीला दिले आहेत. त्यात वैशाली भैसने-माडे या एक आहेत. आजच्या तरुणाईसाठी वैशाली हे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहे. दरवर्षी तिच्या कार्याचा सन्मान हा शासनदरबारी किंवा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून होतो. यापूर्वी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे 118 आणि शासनाचे 19 असे पुरस्कार वैशाली यांना मिळाले आहेत. “आता उजाडेल’, “सुकून’, “भरारी’, “कृष्णवेदिले’, “कोलाज’ आणि नव्याने येत असलेला “कुछ तुम भी’ गाण्यांचे अल्बम असे 150 पेक्षा जास्त अल्बम वैशाली यांनी गायले आहेत. वैशाली माडे फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सर्वांना गाणं शिकण्यासाठी एक मोठे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे.अलीकडे “तु.का. पाटील’मध्ये वैशाली यांनी गायलेले “भल्या पहाटे स्वप्नात येतो’ हे गाणे सर्वत्र खूप गाजत आहे.