
मुंबई : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल आज वाजण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता पत्रकार परिषद घेणार असून, यावेळी जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकींची घोषणा होऊ शकते.
मतदार यादीतील दुबार नोंदींमुळे विरोधकांनी निवडणुका लांबवाव्यात, अशी मागणी केली असली तरी आयोग आज अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्याच्या तयारीत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राज्यात आचारसंहिता लागू होईल. या काळात कोणत्याही प्रकारची लोकप्रिय घोषणा, शासकीय निधी वितरण किंवा विकासकामांची घोषणा करता येणार नाही.
निवडणुकीची प्रक्रिया सुमारे दीड ते दोन महिने चालण्याची शक्यता आहे. आयोगाकडून या निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा विचार असून, पहिल्या टप्प्यात नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुका नोव्हेंबरमध्येच पार पडू शकतात.
यानंतर डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशनानंतर जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महानगरपालिकांच्या निवडणुका जानेवारीत पार पडू शकतात. मात्र, ज्या भागांत तत्काळ निवडणुका होणार नाहीत, तिथे आचारसंहिता अंशतः शिथिल ठेवली जाण्याची शक्यता वर्तवली जाते.
राज्यातील सर्व पक्षांनी या पत्रकार परिषदेकडे लक्ष केंद्रित केले असून, आयोगाच्या घोषणेनंतर राजकीय तापमान चढणार यात शंका नाही.
			



    
    




			
			