Published On : Mon, Feb 19th, 2018

देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे मोठे योगदान – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Advertisement

मुंबई : महाराष्ट्र राज्य देशातील पहिले ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीकडे वाटचाल करणारे राज्य असून देशाच्या आर्थिक विकासात महाराष्ट्राचे योगदान मोठे आहे असे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले.ते आज बीकेसी येथे आयोजित ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

श्री. मोदी म्हणाले की, फडणवीस सरकारच्या सुधारणावादी धोरणांमुळे उद्योग क्षेत्राला एक नवी झळाळी प्राप्त झाली आहे. उद्योगांमुळे परिवर्तन आलेले आहे. गेल्या तीन वर्षामध्ये केलेल्या अथक प्रयत्नांमुळे देशभर फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीची चर्चा होऊ लागली आहे.

Gold Rate
15 May 2025
Gold 24 KT 92,100/-
Gold 22 KT 85,700/-
Silver/Kg 94,800/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

महाराष्ट्र सरकारने ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठरविले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत हे सहज शक्य आहे. आज जो महाराष्ट्राचा विकास दिसतो आहे, तो देशाच्या सामर्थ्याचे प्रतीक आहे. पायाभूत क्षेत्र विकासात महाराष्ट्र राज्य अग्रेसर ठरले आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत पहिला क्रमांक पटकाविला आहे. मानवी हस्तक्षेप कमी करुन तंत्रज्ञानाच्या आधारे जनतेसाठी द्यावयाच्या सोयीसुविधा अधिक सोप्या करण्यासाठी केंद्र सरकारने काम सुरु केले आहे. त्यामुळे कामकाजात पारदर्शकता वाढून विश्वासार्हता वाढणार आहे. सरकारने निरुपयोगी कायदे रद्द करून काही नवे कायदे जनतेच्या कल्याणासाठी केले आहेत. आर्थिक सुधारणा करण्याच्या दृष्टीने सरकारने अनेक बदल अर्थसंकल्पात करुन सर्वसामान्य व्यक्ती नजरेसमोर ठेवून विश्वास साधण्याचे ध्येय निश्चित केले आहे. नव्या आर्थिक धोरणांचा लाभ दलित, मागासवर्गातील जनता आणि शेतकऱ्यांना होईल. सर्वांना घरे, शुद्ध पाणी, मुबलक वीज, चांगले रस्ते,चांगल्या आरोग्याच्या सुविधा हे ध्येय गाठायचे आहे.आयुषमान भारत या योजनेत दहा कोटी कुटुंबांना आरोग्य विमा देण्याचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण भागात वेलनेस सेंटर स्थापण्याचा निर्धार आहे. शैक्षणिक क्षेत्रातील सुधारणांसाठी १ लाख कोटींची योजना आहे. मुद्रा योजनेतून लाखो रुपयांचे कर्ज दिले आहे. म्हणूनच मेक इन इंडिया हे धोरण शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे असे सांगून त्यांनी मॅग्नेटिक महाराष्ट्र आर्थिक गुंतवणूक परिषदेला शुभेच्छा दिल्या.

परकीय गुंतवणुकीत राज्य आघाडीवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
सन 2016 मध्ये आयोजित ‘मेक इन इंडिया’ या परिषदेत सुमारे आठ लाख कोटींचे सामंजस्य करार केले गेले होते,त्यापैकी 4.91 लाख कोटी गुंतवणूक आली असून,61% करारांवर प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. ७० लाख कोटी रूपयांचे उत्पादनही सुरु झाले आहे. इतर करारही पूर्णत्वाच्या टप्प्यात आहेत असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात स्वागतपर भाषणात मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या एकूण प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, पुन्हा एकदा जगाला गुंतवणुकीसाठी साद घालत आहोत. प्रधानमंत्री यांनीच आम्हाला ईझ ऑफ डुईंगचा मंत्र दिला आहे. यात लिकॉन या सिंगापूरच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार राज्य क्रमांक एकवर आहे. थेट परकीय गुंतवणकीत मोठी वाढ झाली आहे. ही वाढ तीनशे टक्क्यांनी वाढली आहे. भारतात येणाऱ्या गुंतवणुकीपैकी पन्नास टक्के महाराष्ट्रात आली आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, देशाने फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचे उद्दिष्ट ठेवले आहे तर राज्याने २०२५ पर्यंत ट्रिलियन डॅालर इकॅानॅामीचे ध्येय गाठण्याचे निश्चित केले आहे. यासाठी पाच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्याचे ठरविले आहे. यात सर्वप्रथम तंत्रज्ञान आधारित सेवांवर भर देण्यात येणार आहे. या दृष्टीने कार्यवाही सुरू झालेली आहे. दुसरा मुद्दा हा राज्यातील कौशल्य विकासावर भर देणे हा आहे. कृषीक्षेत्रातील लोकांमधील कौशल्य विकसित करुन रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे.

राज्याने देशात सर्वप्रथम फिनटेक पॅालिसी तयार केली आहे. ३०० नवे स्टार्टअप्स या क्षेत्रात सुरू झाले आहेत. इंटिग्रेटेड इंडस्ट्रीज एरिया ही नवसंकल्पनेवर आधारित असणार आहे.राज्याने सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक वाढविली आहे.एका अहवालानुसार महाराष्ट्रातील मोठ्या प्रकल्पातील गुंतवणूक मोठ्या वेगाने वाढते आहे. निती आयोगानेही महाराष्ट्राला पायाभूत सुविधांच्या विकासात अग्रेसर ठरविले आहे.यातून मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती होणार असून समृद्धी कॅारिडॅारद्वारे महाराष्ट्रातील चौदा जिल्हे जोडले जाणार आहेत.

मुख्यमंत्री यांनी ‘सब का साथ सबका विकास’ यामध्ये महाराष्ट्र देशाच्या ध्येयाशी आणि स्वप्नाशी एकरूप होऊन काम करेल अशी ग्वाही दिली आणि देशाच्या विकासात सहयोग देण्याचे आवाहनही उपस्थित उद्योजक आणि व्यावसायिकांना केले.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणानंतर खालील उद्योगपतींनी भाषणातून मेक इन इंडिया आणि मॅग्नेटिक महाराष्ट्राचा गौरव केला.

साब इंडियाचे अध्यक्ष जेन वाईडस्ट्रॅाम म्हणाले,गुंतवणुकीच्या दृष्टीने खरेच हे चुंबकीय क्षेत्र आहे. चुंबकीय देश, चुंबकीय राज्य आणि चुंबकीय नेतृत्त्व असा संगम झाला आहे.भारत योग्य अशा मार्गावर वाटचाल करत आहे.साहजिकच महाराष्ट्राचे मार्गक्रमणही तसेच आहे. मेक इन इंडिया हे धोरण हे शाश्वत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असून संशोधन आणि विकासाची वृत्ती मध्यम उद्योग प्रकल्पामध्येही यावी असेही ते म्हणाले.

पोस्को इंडियाचे अध्यक्ष गिल म्हणाले, प्रधानमंत्र्याच्या प्रभावशाली नेतृत्त्वाखाली भारत आर्थिक विकास दराच्या क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे. अनेक महत्त्वपूर्ण आणि अशक्यप्राय असे आर्थिक सुधारणांचे, करसंरचनेचे निर्णय घेतले आहेत. त्यामुळेच भारत यापुढेही अशीच वाटचाल करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारत फोर्जचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले,महाराष्ट्राच्या मातीतच उद्योजकतेचा गुण आहे.प्रधानमंत्र्यांचे मेक इन इंडिया हे धोरण महत्त्वाचे आहे. त्यामुळेच आम्ही जागतिक पटलावरील सर्वात मोठा उद्योग ठरलो आहोत. संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षेत्रात मोठे काम करू शकत आहोत.

ह्योसंग उद्योगसमूहाचे अध्यक्ष ह्यों-जो चो म्हणाले, भारताचा कोरियावर मोठा प्रभाव आहे. दोन हजार वर्षांपूर्वीचे दृढ संबंध आहेत. भारत हा सर्वाधिक आर्थिक वृद्धी दर असलेला देश आहे. यापुढे भारत हा आर्थिक वृद्धी दराच्या बाबतीत अग्रेसर देश ठरेल. कर सुधारणा, नागरी सुविधा, परकीय संबंधामध्ये सुधारणा यामुळे निश्चितच महात्मा गांधी हे माझ्यासाठी महानायक आहेत. भारताच्या या ध्येयाचा आम्ही निश्चित आदर करू.

महिंद्रा समूहाचे आनंद महिंद्रा म्हणाले, महाराष्ट्रातच आमच्या उद्योग समूहाची वाढ झाली आहे.महाराष्ट्राकडे ग्रामीण महाराष्ट्राची ताकद आहे आणि दुसरीकडे मुंबईची ताकद असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या एक हजार गावांना मॅाडेल गाव बनविण्याच्या प्रकल्पात सहभागी होण्याचे मोठे समाधान आहे. गावांबरोबरच मुंबईमध्ये परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्नात सहभागी होण्याची तयारी आहे. प्रधानमंत्री पर्यटन क्षेत्रालाही मोठे महत्त्व देतात.पर्यटनातून रोजगाराच्या संधी निर्माण होतात. त्यामुळेच कांदिवली येथे मोठा प्रकल्प साकारणार आहोत.

महाराष्ट्र म्हणजेच भारत आहे. त्यामुळे जागतिक गुंतवणूकदारांना येथे येण्याचे मी आवाहन करतो.

टाटा समुहाचे अध्वर्यू रतन टाटा म्हणाले, टाटा उद्योग समूहाची सुरवात महाराष्ट्रातून आणि नागपुरातून झाली. जेमशेदजी टाटांनी महिला सूतगिरणी सुरु केली. महाराष्ट्रात पुन्हा गुंतवणूक क्षेत्राला चालना मिळत आहे. महाराष्ट्राचे भवितव्य सर्वांग सुंदर आहे. नव्या सरकारमधील नेतृत्त्वाने यादृष्टीने सकारात्मक प्रयत्न केले आहेत. औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे नेहमीच अग्रेसर राहिले आहे. मी उद्योजकांनाही आवाहन करतो की महाराष्ट्र हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्कृष्ट राज्य आहे.नव्या भारताला साकारताना नव महाराष्ट्र साकारण्यासाठीही योगदान देऊ या असे ते म्हणाले.

एमर्सनचे अध्यक्ष एडवर्ड मॅान्सर म्हणाले,अमेरिका आणि भारत संबंधांची सातत्याने दृढीकरणाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. यातून महाराष्ट्राची परकीय गुंतवणुकीसाठी सकारात्मक दृष्टी दिसून येते. एमर्सन भारतात गेली अनेक दशके कार्यरत आहे. अभियांत्रिकी क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कौशल्यांबाबत तसेच संशोधन-विकासाचे काम येथे चालते. प्रधानमंत्री मोदी यांच्या दृष्टीकोनाचे स्वागत करायला हवे. ज्यामध्ये ग्लोबल मार्केट ते लोकल टॅलेंट ही संकल्पना अभिप्रेत आहे. महाराष्ट्रातील एमआयडीसी ही यंत्रणा सर्वोत्कृष्टरित्या कार्यरत आहे. ज्यामुळे अनेक उद्योगांना चालना मिळाली आहे.

व्हर्जिन हायपरलूप वन उद्योग समूहाचे अध्यक्ष रिचर्ड ब्रॅन्सन म्हणाले,पुणे,मुंबई दरम्यान एक प्रायोगिक पथ निर्मिती प्रकल्प उभारणीचा प्रयत्न सुरु आहे. पुणे ते नवी मुंबई विमानतळाचा प्रवास पंधरा ते वीस मिनिटांत होऊ शकतो.एकविसाव्या शतकातील दळणवळणाच्या क्षेत्रातील मोठी क्रांती करण्याच्या टप्प्यावर आपण उभे आहोत. यातून मोठी सामाजिक आर्थिक क्रांती अपेक्षित आहे. पुणे-मुंबई हा पहिला राष्ट्रीय पथदर्शी प्रकल्प असेल. पण पुढच्या टप्प्यात अन्य शहरांनाही एकमेकांशी जोडण्यासाठी प्रकल्प आणता येतील.

उद्योजक मुकेश अंबानी म्हणाले, प्रधानमंत्र्यांच्या दूरदृष्टीमुळे भारतात अनेक ऐतिहासिक बदल घडताहेत. पण यातही महत्त्वाचे म्हणजे विकासाची मानसिकताही बदलली आहे. काही अशक्य ध्येयप्राप्तीसाठीही तुम्ही प्रोत्साहन दिले आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुंतवणुकीच्या अनुषंगाने असे महत्त्वाकांक्षी ध्येय निश्चित केले आहे. त्यामुळेच मला महाराष्ट्राला महत्वाकांक्षी महाराष्ट्र म्हणावे असे वाटते आहे. चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये महाराष्ट्र हे अग्रेसर राज्य ठरेल असा विश्वास आहे. यामुळेच अनेक नवसंकल्पना राबविताना विश्वस्तरावर भारत हा औद्योगिक क्रांतीच्या दृ्ष्टीने महत्त्वाचा देश ठरेल. महाराष्ट्राचे त्यामध्ये मोठे योगदान राहील. त्यामुळेच चौथ्या औद्योगिक क्रांतीला पुढे नेण्यासाठी रिलायन्स इंटिग्रेटेड इंडस्ट्रीयल एरिया महाराष्ट्रात स्थापन करेल.सेवा क्षेत्रासाठी निगडीत चौथ्या औद्योगीक क्रांतीत प्रधानमंत्री नेरंद्र मोदी यांच्या प्रोत्साहनमुळे आपण निश्चितच पुढे राहू.

स्वीडनच्या सचिव कॅरीन रोडीग्ज म्हणाल्या,स्वीडनच्या भारतातील दरम्यानच्या वित्तीय आदान-प्रदानामुळे दृढ संबंध निर्माण झाले आहेत.प्रधानमंत्री मोदी आणि स्वीडनच्या प्रधानमंत्र्यांच्या प्रयत्नामुळे पर्यटन, व्यावसायिक, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक बाबींना चालना मिळाली आहे. यापुढेही स्वीडीश कंपन्यांनीही भारतात उद्योगाच्या अनुषंगाने भारतात आणि महाराष्ट्रात गुंतवणूक प्राधान्य दिले आहे. गेल्या दशकात अनेक कंपन्यांनी महाराष्ट्रात विविध उद्योगात गुंतवणूक केली आहे.लोकशाहीभिमुख संबंधांना आणि द्विपक्षीय संबंधांना अनेकविध पध्दतीने दृढ करण्यास प्राधान्य दिले आहे.भारत हा समृद्ध आणि तरूण नागरिकांचा देश आहे. समाजाच्या विकासात महिला आणि मुलांचे स्थान मोठे असते. त्या अनुषंगानेही आम्ही काही प्रकल्प साकारले आहे. भारत हा विश्वपटलावरील एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आहे.

या उद्घाटनाप्रसंगी राज्यपाल चे विद्यासागर राव, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, उद्योगमंत्री सुभाष देसाई, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, मंत्रिमंडळातील सदस्य आणि उद्योगपती उपस्थित होते.

Advertisement
Advertisement
Advertisement