नागपूर : राज्यात काही दिवसांपासून राजकीय घडामोडींचा वेग वाढला आहे. येत्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतराचे वारे वाहू लागले. काँग्रेसला खिंडार पाडत जेष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी नुकताच भाजपचा झेंडा हाती घेतला. चव्हाण यांच्या पाठोपाठ अंकित गोपाळराव गुमगावकर यांनी महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेस राज्य सोशल मीडिया समन्वयक या पदाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
दरम्यान आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, हर्षवर्धन पाटील, मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, नांदेडचे खासदार प्रताप चिखलीकर यांच्यासह भाजप कार्यकर्ते आणि समर्थकांच्या उपस्थीतीत अशोक चव्हाण यांचा पक्षप्रवेश पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अशोक चव्हाण यांच्याकडून भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा अर्ज भरून घेतला.
त्यानंतर त्यांच्या गळ्यात भाजपचा गमछा टाकून चव्हाण यांचा भाजप प्रवेश झाला. याच वेळी अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक माजी आमदार राजूरकर यांचाही भाजपमध्ये प्रवेश झाला.