Published On : Fri, Jun 15th, 2018

… तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही’; राहुल गांधी

Rahul Gandhi

नवी दिल्ली : ‘महाराष्ट्रातील या दलित मुलांचा गुन्हा केवळ इतका आहे की, त्यांनी ‘सवर्ण’ समाजाच्या विहिरीत आंघोळ केली. आरएसएस/ भाजपाच्या मनुवादाच्या विषारी राजकारणाविरोधात जर आपण आवाज उठवला नाही तर इतिहास आपल्याला कधीच माफ करणार नाही”, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.

आंघोळ करुन विहीर बाटवली म्हणून मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगावमधील वाकडी येथे घडली आहे. या प्रकरणी ईश्वर बळवंत जोशी व प्रल्हाद उर्फ सोन्या लोहार या दोघांविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.

मातंग समाजातील दोन मुलांची नग्न धिंड काढून त्यांना अमानुष मारहाण करण्यात आल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना जळगावमधील वाकडी येथे घडली आहे. यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आरएसएस आणि भाजपाला धारेवर धरले आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकडी येथील सचिन चांदणे व राहुल चांदणे हे मातंग समाजातील तरुण रविवारी ईश्वर बळवंत जोशी यांच्या शेतातील विहिरीवर पोहण्यासाठी गेले होते. या कारणावरुन जोशी व प्रल्हाद लोहान यांनी या मुलांना अमानुष मारहाण करत त्यांची गावातून नग्न धिंड काढली.

या प्रकाराची वाच्यता करू नये, म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली. या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या घटनेला वाचा फुटली. पोलिसांच्या तपासाची चक्रे फिरली आणि आरोपींविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना तत्काळ अटक करण्यात आली.